नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
यवतमाळ/प्रतिनिधी – जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कारण मतदानाचा हक्क बजावणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. निवडणुकीत १ मतालाही फार किंमत आहे. मतदार वेळात वेळ काढून मतदान केंद्रांवर दाखल होत असतात. त्यात ग्रामीण भागात शेतकरी आपली सर्व कामे बाजूला ठेवून येतात. तसेच वाहने नसल्यामुळे अनेक लोकांचे, वृद्ध नागरिकांचे हाल होतात. तरी देखील ते उन्हातानातून मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर येत असतात. पण मतदानाच्या वेळी जर मतदान बंद ठेवण्यात आले तर?
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल ला मतदान झाले होते. मतदानाच्या वेळेत झालेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदानाच्या वेळेत कर्मचारी हे मतदान केंद्राच्या आतच जेवण करण्यासाठी बसल्याने दुपारी 25 मिनिटं मतदान प्रक्रिया बंद होती. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघसाठी मतदान सुरू असताना यवतमाळच्या च्या हिवरी येथे मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. जेवण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मतदान केंद्राच्या बाहेर महिला, पुरुष मतदारांची मोठी रांग लागली होती. मतदानासाठी आलेल्या वृद्ध महिला आणि इतर नागरिक हे ताटकळत केंद्राच्या बाहेर बसले होते. कर्मचाऱ्यांचे जेवण झाल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.
विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदान प्रक्रिया बंद ठेवता येत नाही, तरी देखील हिवरी येथील मतदान बूथवरील कर्मचाऱ्यांनी नियम न जुमानता मतदान प्रक्रिया बंद ठेवून जेवण केले. कामचुकार कर्मचाऱ्यांवर प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.