नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
धुळे/प्रतिनिधी – महाराष्ट्रा राज्य हे नैसर्गिकरित्या संपन्न आहे मग ते पर्वतरांगा,नद्या असो वा काळी सुपीक माती. एवढा नैसर्गिक वारसा असताना सुद्धा पूर्वापार काळापासून चालत आलेली दुष्काळाची समस्या ही अजून तशीच आहे. शैक्षणिक, औद्योगिक प्रगती झाली पण शेतीविषयक समस्या अजूनही तशाच आहेत. शेती हे एकच शेतकऱ्याच्या उपजीवेकेचं महत्वाचं साधन आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे मात्र निकुंभे गावातील फळ उत्पादक शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत असून पाण्याअभावी फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील निकुंभे हे गाव फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध असून येथील पपई, बोरे, सिताफळ केळी या फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते या फळ पिकातून येथील शेतकरी दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पादन घेऊन आपला उदरनिर्वाह करतात. विशेष म्हणजे या गावाची या फळ उत्पादनातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असते, मात्र मागील वर्षी झालेला अत्यल्प पाऊस आणि त्यातच यावर्षी वाढता उन्हाळा यामुळे शेतीला पाणीपुरवठा करणारी जलस्त्रोत मोठ्या प्रमाणावर आटल्याने फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
दरवर्षी होणारी लाखो रुपयांची उलाढाल यावर्षी मात्र शून्यावर येऊन ठेपली आहे. गावातील विहिरी, कुपनलिका यांनी पूर्णपणे तळ गाठल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे, अक्कलपाडा धरण आणि सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना या दोन्ही जलप्रकल्पांचे पाणी निकुंभे गावाला मिळाल्यास त्याचा फायदा हा इथल्या फळबागांना होणार असून गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी येथील ग्रामस्थ सातत्याने लोकप्रतिनिधींकडे करीत आहे. मात्र तरी देखील गावाचा पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही. फळ उत्पादनातून निकुंभे गावातील शेतकरी प्रत्येकी 20 लाख रुपयांचे उत्पादन घेत असतो मात्र पाण्याअभावी पिके जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी राजकारणी मोठ्या प्रमाणावर व्यस्त असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहण्यास त्यांना वेळ नसून शेतकऱ्यांचे होणारे लाखो रुपयांचे नुकसान थांबवावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. कारण शेतकऱ्याला थोडे चांगले दिवस आले की अशा अचानकपने उद्भवलेल्या नैसर्गिक समस्यांमुळे कष्टाने उगवलेल्या पिकाचे नुकसान होते आणि मग शेतकरी कर्जबारी होतो.