नेशन न्यूज मराठी टीम.
दौंड -प्रतिनिधी – सरकारने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली असली तरी प्रत्यक्षात मात्र जनजागृती अभावाने प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे.त्यामुळे शासनाने घातलेली बंदी कागदावरच राहिली आहे.प्लास्टिक बंदीचा निर्णय घेऊन सुमारे तीन वर्षे उलटल्यानंतर देखील अद्याप दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर प्लॅस्टिक बंदी संदर्भात उदासीनता असल्याने कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने दौंड तालुक्यात प्लॅस्टिकचा वापर सर्रासपणे सुरू आहे.मार्च 2014 मध्ये प्लॅस्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आदेश देण्यात आले होते.त्यानुसार ग्रामपंचायत स्थरावर अमंलबजावणी करणे यामध्ये सूचना बोर्ड लावणे, दुकान व वैयक्तिक स्थरावरील प्लॅस्टिक गोळा करणे, नोटिसा व सूचना देणे, आवाहन करणेदंडात्मक कारवाई करणे, अहवाल वेळोवेळी सादर करणे व जनजागृती करणे याबाबत सूचित करण्यात आले होते.माञ आजतागायत कोणत्याही ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई केल्याचे दिसून येत नाही.ग्रामीण भागात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगांवर प्लॅस्टिकचे अधिराज्य दिसून येत आहे.
यात उकिरड्यावर चरणाऱ्या जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक जाऊन त्यांना गंभीर आजार होत आहेत.नव्या आदेशानुसार प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.असे असूनही प्लास्टिक पिशव्यांच्या वापराचे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालले आहे.25 ते 30 टक्के कचरा प्लास्टिकचा असतो.त्यामुळे आरोग्य पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत.नद्या-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा टाकण्यात येतो.त्यामुळे नद्या-नाले तुंबुन पूरस्थिती निर्माण होते.त्यामुळे
प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.कापडी कागदाच्या पिशव्यांसाठी अनुदान राज्यसरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण शहर जीवनोन्नती अभियानांतर्गत रोजगार वाढीसाठी तसेच कुटिरोद्योगातून निधी उपलब्ध करून दिला जातो.प्लॅस्टिक जाळल्या नंतर निघणाऱ्या धुरामुळे अनेकांना श्वसनाचे विकार जडले असून यावर वेळीच कारवाई होणे गरजेचे आहे.
या बाबत अजिंक्य येळे,गटविकास अधिकारी दौंड यांना विचारले असता त्यांनी सागितले की प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
केंद्र शासनाच्या कायद्यानुसार ७५ मायक्राॅनपेक्षा कमी वजनाच्या प्लास्टिकवर कारवाई केली जात आहे.प्लास्टिक पिशव्या देणाऱ्या दुकानदारांना,भाजीवाल्याना, फळवाल्याना सुचित करण्यात येते कि प्लास्टिक साठवण,विक्री,वितरण यावर बंदी घालण्यात आली आहे.याचे उल्लंघन केल्यास पाच हजार,दहा हजार,पंचवीस हजार रुपये दंड केला जाऊ शकतो असे ग्रामपंचायत यवत कडून सांगण्यात येत आहे.यवत ग्रामपंचायतला 15 लाख रुपये किंमतीचे प्लास्टिक निर्मुलन युनिट मंजूर करण्यात आले आहे.लवकरच हे युनिट सुरू करण्यात येणार आहे.शेजारच्या गावातील प्लास्टिक कचरा सुद्धा उचलून आणून तो नष्ट केला जाणार आहे.त्यामुळे यवत शेजारच्या गावांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. अशी प्रतिक्रिया बबन चखाले ग्रामविकास अधिकारी यवत यांनी माध्यमांना दिली.