DESK MARATHI NEWS ONLINE.
ठाणे/प्रातिनिधी – मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॅार्म नंबर ५ च्या रुंदीकरणासाठी पहिल्यांदाच मध्य रेल्वेने तब्बल ६३ तासांचा मेगा ब्लॅाक घेतला आहे. या मेगा ब्लॅाकचा सर्वात मोठा परिणाम रोज ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखों नागरिकांवर झाला. परंतु आता ठाणे रेल्वे स्थानकावरील रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या समस्या कमी होणार आहेत. रेल्वेने ठरवल्यानुसार काम सुरू असून फलाट रुंदीचे आणि रूळ स्थलांतराचे काम करण्यात आले असून रात्रभरात कामाचा वेग वाढला. रेल्वे (Railway) रुळात उतरून अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली.
या मेगा ब्लॅाकचा (Megablock) पहिला टप्पा संपत आला असून ठाणे (Thane) रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर पाच वरील रेल्वे ट्रॅक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचे काम अवघ्या आठ तासातच करण्यात आले. प्लॅटफॉर्मची रुंदी ३.९ मीटरने वाढवण्यात आली आहे. या रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून उद्या दुपारी ३.३० वाजता हा मेगा ब्लॅाक संपणार आहे. मात्र, मेगा ब्लॉकमुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या काही रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आहे.