नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. साल २०१४ पासून लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मध्य शिवसेनेचा ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये विधानसभेचे अणुशक्तीनगर, चेंबूर, सायन-कोळीवाडा, धारावी, माहीम आणि वडाळा हे मतदारसंघ येतात. चेंबूर नाका येथील अणुशक्ती नगर मतदार संघात काँग्रेस नेते आणि माजी महापौर चंद्रकांत हांडोरे यांच्या नेतृत्वात इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दक्षिण मध्य मुंबई मविआचे उमेदवार अनिल देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रचार करण्यासाठी जिथे जात आहोत, तिथे उत्तम असा प्रतिसाद मिळत असल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले.
प्रचारादरम्यान अनिल देसाई यांनी नीळा टिळा लावला नाही असा आरोप विरोधी पक्षाने त्यांच्यावर केला होता. हा आरोप अनिल देसाई यांनी फेटाळून लावला आहे. यावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले “विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाहीये. विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीही नसल्यामुळे ते असले बिनबुडाचे आरोप करत आहेत. आम्ही सर्व ठिकाणी प्रचार करतोय,विविध जाती धर्मातले लोक मला भेटत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मला दैवतासमान आहेत. त्यामुळे विरोधकांनी हा विचार करायला हवा की गेल्या पाच-दहा वर्षात त्यांनी जनतेसाठी काय काम केले, लोकांच्या कोणत्या समस्या सोडवल्या. लोकं हे विचारात आहेत. असा टोला अनिल देसाई यांनी विरोधी पक्षाला लगावला.