नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
धुळे/प्रतिनिधी – लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या असून रणधुमाळी सुरू झाली आहे. सगळ्याच राजकीय पक्षांकडून मतदारांना मोठ्या प्रमाणावर आश्वासने जाहीर करण्यात आली आहेत. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यावर विविध पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात येत आहेत. यात बेरोजगारी, महागाई तसेच शिक्षण, नोकरी यासह विविध प्रश्नांचा समावेश करण्यात येत आहे.
समाजातील विविध घटकांच्या भावी खासदारांकडून काही अपेक्षा आहेत. पण समाजाची उपेक्षा ज्यांना सहन करावी लागते ते म्हणजे तृतीयपंथी. तृतीयपंथींविषयी नेहमीच समाजातील इतर घटकांच्या मनात दुजाभाव राहिलेला आहे. तृतीयपंथी यांच्या मागण्यांबाबत निवडून येणाऱ्या खासदारांनी विचार करावा तसेच त्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा धुळ्यातील तृतीय पंथीयांनी व्यक्त केली आहे.
“निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आमच्यासाठी कोणत्याही योजनांचा समावेश केलेला नाही, मात्र तरी देखील आम्ही मतदानाचा हक्क बजावून खासदारांना निवडून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो. मात्र निवडणुका झाल्यानंतर आमच्या प्रश्नांकडे कोणीही लक्ष देत नाही शासन दरबारी आमच्या मूलभूत समस्यांकरिता वारंवार विनवण्या करून देखील त्याची दखल कोणीही घेत नाही. यामुळे येणाऱ्या खासदारांनी शिक्षण, नोकरी, मूलभूत सुविधा यासह निवास, स्मशानभूमी या महत्त्वाच्या आणि अत्यंत मूलभूत अशा गरजा पूर्ण कराव्यात” अशी अपेक्षा त्यांनी यावेळेस व्यक्त केली.