नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
पालघर/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस झाला. पालघरमध्ये १५ आणि १६ मे रोजी झालेल्या वादळी पावसामुळे २२ केव्ही उच्चवाहिनीचे ८९ खांब पडले. या अवकाळी पावसाचा महावितरणच्या कल्याण परिमंडलाला मोठा फटका बसला. २ रोहित्र, १९० उच्चदाब आणि २७३ लघुदाब वीजवाहिनीचे खांब या वादळी वाऱ्यामुळे जमिनदोस्त झाले. २० मे रोजीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या जनमित्रांनी अविरत परिश्रमाद्वारे सर्वच मतदान केंद्रावरील वीजपुरवठा सुरळीत केला. परिणामी संबंधित मतदान केंद्रावरील विशेषत: पालघर जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुलभ झाली.
एकट्या मोखाडा शाखेतील ८३ तर खोडाळा शाखेतील ६ खांब पावसामुळे पडले. त्यामुळे खोच, पळसपाडा, घानवळ, नांदगाव, शिवली, झाप, पवारपाडा, चप्पलपाडा, सावर्डे या गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता सुनिल भारंबे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितिन संखे, उपकार्यकारी अभियंता राजेश शिवगण, शाखा अभियंता निखिल बनसोडे, किरण थाटे आणि जनमित्रांच्या टिमने कंत्राटदारांच्या कामगारांच्या मदतीने २२ केव्ही खोडाळा, २२ केव्ही खर्डी, २२ केव्ही मोखाडा फिडरवरील सर्व मतदान केंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत केला. दुर्गम व डोंगराळ भाग असल्याने प्रसंगी ६०० मीटरपर्यंत खांद्यावर खांब वाहून जलदगतीने काम पूर्ण करण्यात आले. परिणामी २० मे रोजी संबंधित मतदान केंद्रांवरील मतदानाची प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्यात मदत झाली. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी या कामगिरीबद्दल कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.