नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – रस्त्यावरील मुलांना काळजी व संरक्षणाची गरज असून त्यांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाने फिरती पथक हा पथदर्शी पथक राबविण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. संस्थांनी सात दिवसाच्या आत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केले आहे.
नाविन्यपूर्ण कार्यक्रमाअंतर्गत ठाण्यासह नाशिक, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि नागपूर या 6 जिल्ह्यांमध्ये 6 महिन्यांकरिता प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे. सदर प्रकल्पास केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाचा खर्च बाल न्याय निधीमधून भागवण्यात येणार आहे. फिरती पथक राबविण्यासाठी शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे सर्व अटी शर्थीचे पालन चालविण्यास उत्सुक असलेल्या व 25 आसनी बस/व्हॅन, वाहन चालक, समुपदेशक, काळजीवाहक, शिक्षक हे कर्मचारी, बस/व्हॅन मधील मुलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव सात दिवसाच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी परिसर, खारकर आळी, कोर्ट नका, ठाणे (पश्चिम) या पत्त्यावर कामकाजाच्या वेळेमध्ये संपर्क साधून सादर करावेत, असे आवाहन गायकवाड यांनी कळविले आहे.