नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अमरावती/प्रतिनिधी – राज्यातील अनेक गावांमध्ये एकीकडे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत (Natural sources) आटल्याने संकट ओढावले आहे. तर दुसरीकडे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या मनमानिमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात येणाऱ्या वंडली (Vandali) गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो. मात्र गावामधील दोन गटात पाण्यावरून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला. मालटेकडी जवळील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात प्रहारचे वसु महाराज व ग्रामस्थांनी ३ तास अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिय्या घेतला. गावाला पाणीपुरवठा करणारा वॉलमन दुजाभाव करतो आहे आणि त्याला अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे, असा आरोप गांवकऱ्यांकडून करण्यात आला.
८ दिवसात गावातील प्रत्येक घरामध्ये सुरळीत आणि एक सारखा पाणीपुरवठा न झाल्यास ग्रामस्थ, महिला व लहान मुलांना घेऊन मोठे आंदोलन करू अस इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. अर्ध्या गावात पाणी मिळते आणि अर्ध्या गावात नाही असे ग्रामस्थांचे मत आहे. टाकीमध्ये पाणी असताना अर्ध्या गावाला पाणी का मिळत नाही याची आम्ही चौकशी सुरू केली आहे. वॉलमन, सुपरवायझर, कंत्राटदार यांना धारेवर धरून पाणीपुरवठा करताना दुजाभाव होऊ नये यासाठी उपाय योजना आम्ही करतो आहे. आज किंवा उद्या याचा परिणाम दिसून येईल. तरीही वॉलमन योग्य प्रकारे काम करत नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे प्रभारी कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.