नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण ग्रामीण/ प्रतिनिधी- गावांमधील भंडार्ली गावच्या डोंगरावर ठाणे महापालिकेचा सुरू असलेला डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. शुक्रवारी स्थानिक आमदार राजू पाटील यांच्यासह १४ गाव सर्वपक्षीय विकास समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी संयुक्त पाहणी करत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याण ग्रामीण भागातील भंडारली गावच्या डोंगरावर ठाणे महापालिकेचे डम्पिंग ग्राउंड सुरू करण्यात आले होते. एका वर्षासाठी सुरू करण्यात आलेले हे डम्पिंग राहून एक वर्ष उलटला तरी सुरूच आहे. या डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरात दुर्गंधीच साम्राज्य,भात शेतीला प्रदूषित पाण्याचा धोका तसेच गावात प्रचंड माशांचे थवे दाखल झाले आहेत. वारंवार महापालिकेच्या निदर्शनास हि बाब आणून देखील महानगरपालिका लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली असल्याने हे डम्पिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवार पासून ग्रामस्थ स्वतः रस्त्यावर थांबून एकही कचऱ्याची गाडी डोंगरावर जाऊ देणार नाहीत अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
सध्या या डम्पिंग वरील पाण्याचे प्रवाह भंडार्ली गावामधून वाहत असल्याने शेती आणि नद्या,नाले देखील प्रदूषणाच्या विळखात सापडले आहेत. त्यामुळे आता १४ गावातील जनतेचा रोष हा ठाणे मनपाला सहन करावा लागणार आहे. यावेळी आमदार राजू पाटील म्हणाले की, तत्कालीन नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली ग्रामस्थांना बैठकीतील आश्वासन पाळली नाहीत. तर वेळेत डम्पिंग बंद करणार असल्याचे देखील सांगितले होते. १४ गावांमध्ये सुखसोयी देणार असे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची आश्वासन पाळली गेली नसल्याने. राजू पाटील यांनी मुख्यमंत्री सपशेल फेल ठरले असे ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर सर्व पक्षीय विकास समिती आणि ग्रामस्थांनी हे डम्पिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच परिसरात कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील अस देखील आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहे. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे मा.सदस्य रमेश पाटील, सर्व पक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, गुरुनाथ पाटील,विजय पाटील यांसह ग्रामस्थ आणि संबंधित डम्पिंग ग्राउंडचे ठेकेदार देखील उपस्थित होते.
सर्व पक्षीय विकास समिती आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती तातडीने स्थानिक पोलिसांना कळवण्यात आली आहे.शुक्रवारी सायंकाळी शिळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांची भेट घेत डम्पिंग आम्ही बंद करत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.त्यामुळे वेळेत बंद न झालेले डम्पिंग बंद न झाल्यास भंडार्ली डम्पिंग प्रश्न पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भंडार्ली येथील डम्पिंगमुळे परिसरातील बागायतदार,भात शेती करणारे शेतकरी, तबेला मालक तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या संदर्भात तातडीने पंचनामे करून नागरिकांना योग्य ती मदत शासनाद्वारे करण्याचे आश्वासन मनसे आमदार राजू पाटील यांनी दिले आहे. या संदर्भात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार राजू पाटील यांनी स्थानिकांना दिले आहे.