नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नवी मुंबई/प्रतिनिधी - मुंबईत काही दिवसांपूर्वी घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेने मुंबईसह पूर्ण देश हादरला. मुंबईतील घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपावर महाकाय होर्डिंग आदळले होते. या घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 75 जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर महानगर पालिका ॲक्शन मोडवर आली आहे. मुंबई सहित ठाण्यातील अनेक भागांमध्ये अनधिकृत होर्डिंग्स वर रोखठोक कारवाई केली जात आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अतिक्रमण विभागामार्फत अनधिकृत होर्डिंग विरोधातील कारवाई दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पहाटेपर्यंत अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यात आली. यात घणसोली,कोपरखैरणे व तुर्भे विभागातील पाच मोठे होर्डिंग हटवण्यात आलेले आहेत. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ.राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी व त्यांचे अधिनस्त सहकारी यांनी तांत्रिक समुहासह अनधिकृत होर्डिंग हटाव मोहीम सलग दोन दिवस पहाटेपर्यंत प्रभावीपणे राबवली.
घणसोली विभागात हॉटेल रामडा,औरम निवासी संकुल,ठाणे बेलापूर सर्विस रोड येथील मोठे होर्डिंग निष्काषित करण्यात आले. त्याचप्रमाणे ठाणे बेलापूर रोडवर कोपरखैरणे विभागात एमआयडीसीच्या फायर ब्रिगेड जवळ असलेले फार मोठ्या आकाराचे होर्डिंगही हटविण्यात आले. तुर्भे विभागामध्ये एपीएमसी मार्केट येथील एक मोठे अनधिकृत होर्डिंग तसेच तुर्भे रेल्वे स्टेशन नजीकची पदपथावर असलेली दोन मोठी अनधिकृत होर्डिंग पहाटेपर्यंत काम करून निष्कासित करण्यात आली.
विभाग कार्यालयांमार्फत त्यांच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण करण्यात आले असून महापालिका आयुक्त यांचे आदेशानुसार अनधिकृत होर्डिंग विरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी तसेच दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डाॅ.राहुल गेठे यांनी सांगितले आहे.