नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने वैविद्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये ट्विटर मोहिम, लघुपट, मराठी चित्रपट, मराठी भाषेच्या महतीवर आधारित व्याख्याने, ग्रंथ प्रदर्शन, वकृत्व स्पर्धा असे कार्यक्रम होणार आहेत.
मराठी भाषा विभागाच्या सूचनेनुसार १४ ते २८ जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’चे राज्यात व राज्याबाहेरील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये आयोजन करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून १४ ते २८ जानेवारीपर्यंत मराठी भाषेशी संबंधित सुविचार देण्यात येतील. यासह मान्यवर कवी त्यांच्या स्वलिखित कविता सादर करतील या कविता परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून दररोज प्रसारित केल्या जातील.
मराठी भाषेची महती सांगणारे लघुपट, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपट सामाज माध्यमांव्दारे तसेच कस्तुरबा गांधीमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.
दिनांक 21 आणि 22 जानेवारी रोजी नवीन महाराष्ट्र सदनातील प्रांगणात ग्रंथ प्रदर्शन लावण्यात येणार आहे. यामध्ये रसिक प्रकाशन, पॉप्युलर प्रकाशन, संस्कृती प्रकाशन, आदी प्रकाशन संस्था पुस्तक विक्री प्रदर्शन लावणार आहेत.
यासह कॅनडा दूतावासातील वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अर्चना मिरजकर यांचे ‘साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली’ या विषयावर व्याख्यानाचे प्रसारण केले जाईल. नुतन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेता विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र दिले जाईल.