कल्याण/संघर्ष गांगुर्डे – योगीधाम परिसरातील शिव अमृतधाम येथील नागरिकांनी तसेच वालधुनी नदी स्वच्छता समितीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री पंचायत राज्य, खासदार कपिल पाटील यांची, त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांना परिसरातील वालधुनी नदी मुळे सातत्याने येणारा पूर व हाय टेन्शन वायर मुळे भविष्यातील संभाव्य दुर्घटना आदी समस्यांविषयी सांगितले. समिती गेली सहा वर्ष सातत्याने आयुक्तांना व जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहारा द्वारे पाठपुरावा करीत असून या विषयी देखील त्यांना सांगितले.
वालधुनी समस्या निर्मूलन करण्यासाठी व पालिका प्रशासनास झोपेतून जागे करण्यासाठी भीक मांगो आंदोलन, हजारो पोस्टकार्ड नागरिकांकडून लिहून घेऊन मुख्यमंत्र्यांना पाठवले, तसेच स्वाक्षरी अभियान राबविले, अशा निरनिराळ्या उपक्रमांविषयी त्यांना माहिती दिली. वालधुनी नदीच्या पात्रातील साचलेला गाळ काढणे आवश्यक असून या पात्राचे खोलीकरण केल्यास पावसाळ्यात उद्भवणारी पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही. यामुळे नागरिकांचे नुकसान होण्यापासून वाचवता येईल. या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.
याबाबत कपिल पाटील यांनी लगेच आपल्या स्वीय सहाय्यकांना केडीएमसी आयुक्तांना पत्र लिहिण्यास सांगितले व स्वतः जातीने लक्ष देऊन या समस्या निर्मूलन करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील असे आश्वासन दिले. तसेच नदीच्या स्वच्छतेसाठी आणि खोलीकरणासाठी लागणारा निधी देखील उपलब्ध करून देणारा असल्याचे सांगितले. यावेळी पुष्पा रत्नपारखी, गणेश नाईक, सुनील उतेकर, पंकज डोईफोडे, भरत गायकवाड, पितांबर शिंदे, अशोक जाधव आदींसह वालधुनी स्वच्छता समितीचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.