नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी – शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कलेचे अनन्यसाधारण महत्व आहे. कलेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक बौद्धिक विकासात वाढ होते. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळून सृजनशीलता वाढीस लागते. विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने कल्याण मधील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेने गेली सात वर्षे या जिल्हास्तरीय आंतरशालेय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केले आहे व यंदाचे हे स्पर्धेचे आठवे वर्ष आहे.
नेहमीप्रमाणे इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय आंतरशालेय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बहुसंख्य शाळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेतला. यावर्षी स्पर्धेला सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. सर्व शाळांतील जवळपास ९००० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. शाळेतील सर्वच शिक्षकांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कल्याण येथील बालक मंदिर संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे हरीश खंडेलवाल अध्यक्ष – कल्याण महानगर व्यापारी फेडरेशन कल्याण तसेच बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळा अध्यक्ष रमेश गोरे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांना मुलांना घडविताना या विषयावर संबोधित केले. याप्रसंगी बालक मंदिर संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळांतील कला शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाला बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षाकांनी मोलचे योगदान दिले.