नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली – डोंबिवलीत एका 33 वर्षीय विवाहितेची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह घरातील सोफ्यात लपवून ठेवणाऱ्या आरोपीला मानपाडा पोलिसांनी अटक केली केली आहे. विशेष म्हणजे एका चपलवरून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीपर्यत पोहचून त्याला ताब्यात घेतल्यानंतर हत्येचे धक्कादायक कारण पुढे आले आहे. विशाल भाऊ घावट (25) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर सुप्रिया शिंदे (33) असे मृतक विवाहितेचे नाव आहे.
मृत सुप्रिया, पती किशोर शिंदे (33) 10 वर्षाचा त्यांचा मुलगा डोंबिवली पूर्वेतील दावडी गावातील ओम रेसिडन्सीमध्ये राहतात. पती किशोर हा मंगळवारी सकाळच्या सुमारास कामावर गेला होता. त्यावेळी सुप्रिया ही घरात एकटीच होती. मात्र संध्याकाळी पती किशोर हा कामावरुन घरी आला तेव्हा सुप्रिया घरात आढळून आली नव्हती. त्यामुळे तिचा शोध घेतला नातेवाईकांकडे चौकशी सुरु केली. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. अखेर मंगळवारी रात्रीच्या सूमारास पती किशोर पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलिस ठाण्यात गेला असता, त्याच्यासोबत आरोपीही गेला. होता. याच दरम्यान काही शेजारी आणि नातेवाईक शिंदे यांच्या घरी आले. त्यांना घरातील सोफा पाहुन संशय आला त्यांनी सोफा उघडून पहिला सोफ्यात सुप्रियाचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हयाचा तपास सुरु केला असता मृत विवाहितेच्या घराचे बाहेर त्या दिवशी दुपारी एक चपल दिसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी मृतकच्या पतीला मोबाईल अॅपव्दारे वेगवेगळ्या प्रकारच्या चपला दाखविण्यात आल्या होत्या. त्यामधील एक चप्पल ओळखुन मृतकच्या घराचे बाहेर असलेली चप्पल नमुद चपलेशी मिळती जुळती असल्याचे सांगितले. सदर चपलेवरून पोलिसांनी तपास केला असता मृतकाचा पती याचा मित्र विशाल घावट हा अशा प्रकारची चप्पल घालत असून तो शेजाऱ्याच्या इमारतीमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता एका फुटेजमध्ये आरोपी विशाल याच्या पायात तीच चपल दिसली. त्यानंतर पोलिसांनी याच माहितीवरुन संशयीत म्हणून विशालला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी सुरु केली.
आरोपी विशालला ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशीतुन धक्कादायक माहिती उघडकीस आली . हत्येचा घटनाक्रम पाहता विशाल हा सोमवार 14 फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मृत सुप्रिया हिचे घरी जावुन काही पुस्तके तिला वाचायला दिली होती. त्यावेळी त्याने त्याची चप्पल घराचे बाहेर काढली होती. मृत सुप्रिया हीचा 10 वर्षांचा मुलगा असल्याने आरोपीने त्यादिवशी मुलाबाबत विचारपुस केली असता सुप्रिया हिने मुलगा दुपारी 12.30 वाजता शाळेत जात असल्याची माहिती दिल्यानंतर पुस्तके देवुन आरोपी विशाल निघुन गेला होता. विशेष म्हणजे मृत पतीचा मित्र असल्याने त्याचे वरचेवर घरी येणेजाणे होते. त्यामुळे इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना त्याचा संशय आला नव्हता.
मृताच्या घरात दुपार नंतर कोणी नसल्याची माहिती काढून मंगळवारी 15 फेब्रुवारी रोजी पुन्हा आरोपी विशाल दुपारी 1.30 वाजता मृत सुप्रिया हिचे घरी पुस्तके देण्याच्या बहाण्याने गेला. त्यावेळी सुप्रिया हिचा मुलगा शाळेत गेलेला होता ती घरात एकटीच असल्याचा गैरफायदा घेवुन आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याला प्रतिकार करुन दरवाजाकडे जावुन आरडाओरड करण्यास सुरवात केल्याचे पाहून आरोपी विशालने सुप्रियाचे डोके पकडुन फरशीवर आपटण्यास सुरूवात केली. तसेच त्याचे खिशात असलेल्या नायलॉन केबल टायने सुप्रियाचा गळा आवळुन तिला ठार मारले. त्यानंतर तिचा मृतदेह घरातील सोफाकम बेडमध्ये लपवुन घरातून पळ काढला होता. मात्र या हत्येचा गुन्हा केवळ चपलेमुळे उघडकीस आला असून गुन्हयाचा अधिक तपास पोनि अनिल पडवळ हे करत आहे.