नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली / प्रतिनिधी – केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी मंगळवारी, बर्लिन येथे झालेली जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि पॅरिसमधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2023 टप्पा 4 मध्ये देशाला गौरव मिळवून देणाऱ्या पदक विजेत्या कंपाऊंड आणि रिकर्व्ह नेमबाजांचा सत्कार केला. या आंतरराष्ट्रीय स्पर्धा या वर्षी ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात आल्या होत्या.
पॅरिस येथील स्पर्धेत भारताने एकूण 5 पदके (2 सुवर्ण, 3 कांस्य) जिंकली, तर बर्लिन स्पर्धेत एकूण 4 पदके (3 सुवर्ण, 1 कांस्य) जिंकली. सत्कार समारंभात आपल्या कामगिरीने इतिहास घडवणाऱ्या आदिती गोपीचंद स्वामी आणि ओजस प्रवीण देवतळे यांच्यासह एकूण 13 नेमबाज उपस्थित होते.
प्रतिभावान नेमबाजांना संबोधित करताना अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, “तुम्ही केलेल्या कामगिरीबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. संशोधन समितीने तुमच्या कामगिरीचे मुल्यांकन केले आहे, आणि तुमच्या उत्तम कामगिरीचा आलेख उंचावत आहे, याचा मला आनंद वाटतो.” शिबिरात सहभागी झालेल्या तिरंदाजांनी प्रदर्शित केलेल्या सुंदर सौहार्दाचा उल्लेख करून केंद्रीय मंत्री ठाकूर पुढे म्हणाले, “संघ भावना सर्वात महत्त्वाची असून, केवळ प्रशिक्षकच नाही तर ज्येष्ठ खेळाडूंनीही आपल्यापेक्षा ज्युनिअर खेळाडूंमध्ये मानसिक बळ आणि सज्जता निर्माण करायला सहाय्य केले, या गोष्टीचा मला अभिमान आहे.
अभिषेक वर्मा सारख्या अनुभवी खेळाडूने, ओजस प्रवीण सारख्या युवा खेळाडूला ज्या प्रकारे प्रेरणा दिली आणि मार्गदर्शन केले ते कौतुकास्पद आहे. “आशियाई खेळ, ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा आणि शेवटी पॅरिस ऑलिम्पिकपर्यंतचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. या सर्व स्पर्धा अत्यंत महत्वाच्या आहेत. एक पदक अनेक यशांच्या शक्यता निर्माण करते”, असे केंद्रीय मंत्री म्हणाले.