नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली / प्रतिनिधी – आशियाई क्रीडा स्पर्धांमधे चमकदार कामगिरी करून मायदेशी परतलेल्या खेळाडूंचा, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सत्कार केला . नवी दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये हा सत्कार समारंभ पार पडला.
यावेळी नेमबाजी, नौकानयन आणि महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू अशा सुमारे 27 खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कर्णधार हरमनप्रीत कौर’च्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने या स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. त्याशिवाय नौकानयन स्पर्धेत भारताने एकूण पाच पदके जिंकली, ज्यात 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. आतापर्यंत पदक तालिकेत, बहुतांश पदके नेमबाजीतून आली आहेत. यात एअर रायफल, शॉटगन आणि पिस्तूल संघांनी तब्बल 13 पदके (चार सुवर्ण, चार रौप्य, 5 कांस्य पदके) पटकावली आहेत.
अनुराग ठाकूर यांनी सर्व खेळाडूंच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. “ मी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन करतो. प्रचंड परिश्रमाने त्यांनी हे यश मिळवले आहे. आपल्याला कदाचित नौकानयन स्पर्धेत पदके मिळवणारे काही खेळाडू अशा प्रदेशातले दिसतील, जिथे पाण्याची कमतरता आहे, मात्र तरीही त्यांनी पाण्याशी संबंधित खेळांमध्ये पदके जिंकली आहेत. आपल्याला घोडेस्वारीमध्ये देखील, ऐतिहासिक सुवर्णपदक मिळाले आहे.” असे ठाकूर म्हणाले.
“नेमबाजीत आपण आपली जिद्द आणि चिकाटी दर्शवली. टॉप्सची (भारतीय क्रीडा प्राधिकरण) खेळाडू, सिफ्ट कौर सामरा हीने केवळ सुवर्ण पदकच जिंकले नाही तर महिलांच्या 50 मीटर रायफल 3P स्पर्धेत जागतिक विक्रम नोंदवला, तर खेलो इंडियाचा खेळाडू रुद्रांक्ष पाटीलनेही 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण जिंकले, आमच्या सर्व नेमबाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली.” असे ठाकूर पुढे म्हणाले.
या कार्यक्रमाला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी आणि खेळाडूंचे कुटुंबिय आणि सहकारी उपस्थित होते.