नेशन न्युज मराठी टीम.
जालना – जालना ते पुणे व किसान रेल्वेचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जालना रेल्वे स्टेशन येथे रेल्वेस हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, आमदार विक्रम काळे, नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, भास्कर दानवे, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, रेल्वेचे एजीएम अरुण जैन, डीएमआर भुपेंद्र सिंग आदींची उपस्थिती होती.
केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले की, जालन्यासह मराठवाड्यातून पुणे शहराकडे प्रवास करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. प्रवाश्यांना केवळ बस व ट्रॅव्हल्सवर अवलंबून राहावे लागत होते. वाढत्या रहदारीमुळे सहा ते सात तास पुण्यासाठी नागरिकांना लागत होते. पुण्यासाठी रेल्वे व्हावी, अशी नागरिकांची मागणी लक्षात घेता जालना ते थेट पुणे रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल करण्यात येत असल्याचे सांगत जालन्यात पीट लाईन व्हावी, अशी मागणी असून तांत्रिक बाबी तपासून यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी यावेळी सांगितले.
किसान रेल्वेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा आसाम राज्यात या रेल्वेच्या माध्यमातून पाठविण्यात आला आहे. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी यावेळी सांगितले यावेळी उपस्थित मान्यवरांचीही समयोचित भाषणेही झाली. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.