नवी मुंबई/प्रतिनिधी – एकीकडे सिडको अंतर्गत नवी मुंबईत अनेक गृह प्रकल्पांचे काम करण्यात आले आहे. पण दुसरीकडे मात्र सिडकोने बांधकाम केलेल्या इमारतीत दैनंदिन जीवनात महत्वाच्या असणाऱ्या अनेक सुविधांचा मोठा अभाव आहे. नवी मुंबई मधील उलवे नोड सिडको ने विकसित केला आहे. येथे अनेक गृह प्रकल्पांची उभारणी करण्यात आली. या इमारतीत रहिवासी राहण्यास आले आहेत. परंतु सिडकोने बांधलेल्या उलवे नोड या प्रकल्पातील इमारतीत मूलभूत सुविधांचा फार मोठा अभाव दिसून येतो. येथील नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
उलवे सेकटर-१५ येथे २०१८ पासून अनेक गृहप्रकल्प बांधून तयार आहेत. परंतु येथील रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. ड्रेनेज लाईन, पाणीपुरवठा , घनकचरा व्यस्थापन, स्ट्रीट लाईट या सारख्या सुविधा अजूनही पुरवल्या गेल्या नाहीत. ज्यामुळे येथील राहिवाशांना प्रत्येक दिवशी नवीन समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अशी माहिती येथील रहिवाशी सचिन मंगोरे यांनी दिली. रहिवासी पाणीपुरवठा जलवाहिनी पोहचली नसल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. सिडको प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना झगडावे लागत आहे.