नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
चंद्रपूर/प्रतिनिधी– सरकारी कार्यालयात खाबुगिरी ही काही नवीन नाही. पण याच प्रमाण वाढतांना आपल्याला दिसत आहे. नुकतेच उत्पादन शुल्क विभागाचे दोन आधिकारी खाबुगिरी करत असतांना एसीबीच्या जाळ्यात आडकल्याची घटना चंद्रपूर मध्ये घडली आहे. 7 मे ला चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना 1 लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी हे घुग्गुस येथील रहिवासी असून त्यांचं घुग्गुस येथे गोदावरी बार अँड रेस्टारेंट आहे. फिर्यादी यांनी वर्ष 2023 नोव्हेंबर मध्ये नवीन बिअर शॉपीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यावेळी त्यांना अधीक्षक संजय पाटील व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी फिर्यादीला आज या उद्या या म्हणत त्यांना नाहक त्रास देत टाळाटाळ केली. काही दिवसांनी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी मी तुमचा बिअर शॉपीच्या परवाना मंजूर करून देतो. मात्र, त्यासाठी अधीक्षक व स्वतःसाठी पैशाची मागणी केली. फिर्यादी यांची पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी 25 एप्रिलला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली. मध्यंतरी फिर्यादी यांना 1 लाख रुपयांची लाच मागितली. 7 मे रोजी उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर कार्यालयात कार्यालय अधीक्षक, अभय खताळ यांनी खारोडे यांच्या सांगण्यावरून 1 लाख रुपयांची रक्कम स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खात्री पटवित, 1 लाख रुपये स्वीकारताना अभय खताळ आणि चेतन खारोडे यांना रंगेहात अटक केली.
सदर लाच प्रकरणी अधीक्षक संजय पाटील, अभय खताळ व चेतन खारोडे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. सदर कारवाई मध्ये तीन आरोपी असून, त्यापैकी दोन आरोपी अभय खताळ व चेतन खारोडे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना १० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, आरोपी क्रमांक एक हे लोकसेवक अद्यापपर्यंत मिळून आला नाही. त्याचा शोधासाठी पथके तयार करून युद्धपातळीवर शोध सुरु असल्याचे माहिती मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी दिली आहे.