प्रतिनिधी.
कल्याण – कल्याण मधील गौरीपाडा परिसरात एक पिस्तुल आणि चार जिवंत काडतूस विकण्यासाठी आलेल्या दोन आरोपीना खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. सुशील भोंडवे व गौरव खर्डीकर अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. करोना लॉकडाउनमुळे मागील 6 महिन्यापासून हाताला काम नसल्यामुळे ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी या मजुरांनी गुन्हेगारीचा मार्ग अवलंबिला असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.कमी श्रमात चांगले पैसे मिळतील या आशेने या दोघांनी उत्तर प्रदेश मधून कमी किमतीत हे पिस्टल विकत घेऊन कल्याणातील ग्राहकाला ते जादा किमतीत विकत देण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र त्याआधीच ते पोलिसांच्या तावडीत सापडले.खडकपाडा पोलिसांना दोन व्यक्ती अग्निश्स्त्रासारखे घातक हत्यार विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात सुशील आणि गौरव हे दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील सुशील याच्याकडे एक पिस्टल तर गौरवकडे चार जिवंत काडतुसे सापडल्याने पोलिसांनी पुढील तपासासाठी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता लॉकडाउन मध्ये हाताला काम नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती डबघाईला आली. यावर मात करण्यासाठी हा मार्ग निवडल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान हे दोघे सदर पिस्टल कोणाला विकणार होते याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.मात्र या घटनेमुळे लॉकडाउन नंतर आता गुन्हेगारी वाढण्याची चिंता पोलिसाकडून व्यक्त केली जात आहे.