नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली / प्रतिनिधी – एलसीए तेजस ट्विन सीटर विमान हवाई दलाकडे सुपूर्त केले गेले. संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे होणाऱ्या भारताच्या वाटचालीचे एलसीए तेजस हे प्रतीक आहे, असे संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांनी सांगितले. बंगळुरू येथे त्यांनी समारंभपूर्वक एलसीए तेजस ट्विन सीटर विमान हवाई दलाकडे सोपविले त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम परदेशी विमानांवरील देशाचे अवलंबित्व कमी करण्याच्या वचनबद्धतेचे एक उत्तम उदाहरण आहे आणि आत्मनिर्भर भारतासाठी आशेचा किरण आहे, असे त्यांनी पुढे नमूद केले.
एलसीए तेजस कार्यक्रम हा अथक समर्पण आणि नावीन्यपूर्णतेची प्रेरणादायी गाथा आहे. भारतीय हवाई दलाला जागतिक दर्जाच्या स्वदेशी लढाऊ विमानांनी सुसज्ज करण्याच्या स्वप्नात एलसीए तेजस विमानांच्या निर्मितीची बीजे असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला हे एक खूप महत्वाकांक्षी स्वप्न आहे असे अनेकजण मनात होते परंतु हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए), डीआरडीओ लॅब्स, सेमिलॅक, डीजीएक्यूए, पीएसयू, आयएएफ आणि इतर असंख्य संस्थांमधील स्त्री-पुरुषांनी या कार्यक्रमात योगदान दिल्याने हा कार्यक्रम वास्तवात उतरला आणि त्यांनीच हे सिद्ध केले की जेव्हा देश हिताचा विचार प्रथम येतो आणि त्यासाठी हे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी सर्व संस्था एकत्र येतात तेव्हा काहीही अशक्यप्राय नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तेजस कार्यक्रमाचे महत्त्व त्यांनी विशद केले. देशाने अत्याधुनिक लढाऊ विमाने तयार करण्याचे अत्यंत आवश्यक ज्ञान मिळवले आणि एरोस्पेस परिसंस्था विकसित केली. तेजसच्या विकासामुळे भारतातील संरक्षण आणि एरोस्पेस उद्योगाच्या वाढीला चालना मिळाली आहे. यामुळे असंख्य लहान आणि मध्यम आकाराचे उद्योग, संशोधन संस्था आणि या प्रकल्पाच्या विविध पैलूंमध्ये योगदान देणाऱ्या कुशल कामगारांसाठी संधी निर्माण झाल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
या पहिल्या मालिकेतील ही एचएएलची तेजस विमाने अत्याधुनिक तंत्रज्ञान, चपळता आणि बहु उद्देशी अशा पैलूंनी सज्ज असून हवाई दलाच्या वैमानिकांना उपयुक्त प्रशिक्षण देतील. हवाई दलाने एचएएलकडे आणखी 83 तेजसची ऑर्डर याआधीच दिली आहे.