नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेतेमंडळी एवढे व्यस्त आहेत की त्यांना राज्यातील नागरिकांचे प्रश्न,त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळच नाहीये. पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत एप्रिल महिन्यातच भीषण पाणी टंचाई आहे. भरपूर पाऊस पडत असून सुद्धा फक्त योग्य नियोजन नसल्यामुळे गावातील आदिवासी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे आदिवासी नागरीक बऱ्याच अडचणींना सामोरे जात आहेत. पावसाळ्यात सुमारे चार हजार मिमी पाऊस पडतो पण फक्त नियोजनाअभावी पाणी टंचाईच्या झळा आत्तापासुनच सुरु झाल्या आहेत. भावली धरणातून १६ कोटी रुपये खर्चून इगतपुरी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची पाईपलाईन घेतली आहे. मात्र तरीही इगतपुरी शहरात गेल्या पाच वर्षापासुन आठवड्यातुन फक्त तीन दिवस पाणी पुरवठा केला जात आहे. तर इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील तळेगाव शिवारातील कातुरवाडी, वाघाचा झाप, मेंगाळ झाप या वस्तीमधील दोनशे ते अडीचशे लोकसंख्या वस्ती असलेल्या आदिवासी नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
या वाडीच्या नागरिकांना थेट दोन किमी असलेल्या घाटनदेवी मंदिर समोरील खोल उंट दरीतील झऱ्यातील पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे. या वाडीपासुन हा झरा जवळपास दोन किलोमीटर असुन रस्ता नसलेल्या थेट खोल असलेल्या डोंगर दऱ्यातुन हे पाणी आणावे लागत आहे. मागील वर्षी येथील आदिवासी नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर नगरपरिषदेने फक्त पाईपलाईन केली मात्र वर्ष उलटुन गेले तरीही या पाईपलाईनला पाणी आलेच नाही. याबाबत येथील आदिवासी नागरिकांनी आदिवासी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांच्याकडे याबाबत समस्या मांडली असता त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली असून तालुक्यातील आदिवासी बांधवांना प्रथम पाणी द्यावे अन्यथा मुंबईला जाणारे पाणी अडवु असा इशारा दिला आहे. भारत एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना या वाड्यातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या वाड्या पाड्यावर नगरपरिषद हद्दीत असुन अद्याप ही या ठिकाणी नळ कनेक्शन पोहचलेले नाही.
“आमच्या वाड्या गेल्या ३० वर्षापासुन नगरपरिषद हद्दीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप ही आमच्याकडे नळ कनेक्शन जोडण्यात आलेले नाहीत. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकी वेळी लोक प्रतिनिधी व नगरसेवक मत मागतांना तुमच्या समस्या सोडवु असे आश्वासन देतात. मात्र आजपर्यंत कोणीही आश्वासनाची पुर्तता केली नाही. या ठिकाणी हाकेच्या अंतरावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा तळेगाव डॅम आहे. या डॅममधुन महामार्गावर असलेल्या अनेक पंचतारांकित हॉटेल व रिसॉर्ट यांना २४ तास पाणी पुरवठा केला जातो. मात्र आमच्या आदिवासी बांधवांवर नगरपरिषद अन्याय करत आहे”असे काँग्रेसचे आदिवासी प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांनी सांगितले.
प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येची दखल घेत पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. कारण प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा या मिळाल्याच पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाची जेव्हा प्रगती होते तेव्हाच देशाची खरी उन्नती होत असते.