अमरावती/प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील घरफोड्या काही केल्या कमी व्हायचे नाव घेत नाही आहेत. पोलीस रात्रीच्या वेळी गस्तीवर असतानाही चोरटे मात्र कुठल्या ना कुठल्या भागात डल्ला मारुन जातात. पण अमरावती शहर गुन्हे शाखेने विविध राज्यात जाऊन घरफोडी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. अमरावती शहर गुन्हे शाखेतील युनिट 1 च्या पथकाने तिघे अट्टल घरफोडी आरोपींना ताब्यात घेऊन घरफोडीच्या अनेक प्रकरणांना उजेडात आणले आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील 5 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
रेवसा येथील रहिवाशी अभिषेक भांनगे यांच्या घरी रात्री अनोळखी चोरट्यांनी रोख व दागिने असा एकूण 1 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. या घटनेत पोलीस तपास करीत असताना मार्की येथे राहणारा अमोल देशमुख काही दिवसांपासून तीन मित्रासह राहत आहे. तिघेही दिवसभर गावात असतात आणि रात्री झाली गावातून बाहेर जाता. काही काम ना करता ते पैशांची उधळपट्टी करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वेळ न घालवता आरोपी अमोल देशमुख यांच्या घरी धाड टाकली. या प्रकरणात अमोल सुरेश देशमुख (रा. मार्की वलगाव), तेजस संजय दरेकर (रा. कांडली परतवाडा) तर विरेंद्र सोभाराम (नागेश्वर किरपाणी) यांना अटक केली आहे.
आरोपींनी अमरावती आधी आकोट, शेगाव, चांदुरबाजार येथे 5 घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या घराची झडती घेतली असता घरातून एक मोबाईल , दुचाकी, 55 ग्राम सोन्याचे दागिने, 641 ग्रॅम चांदी असा एकूण 5 लाख 35 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उप आयुक्त कल्पना बारवकर, यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे, यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.