नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
चंद्रपुर/प्रतिनिधी – ब्रम्हपुरी शहराचे शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा वाव असून येथील अनेक खेळाडूंनी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा व तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने दुस-या महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. 25 वी वरिष्ठ महिला व 6 वी सब ज्यूनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा देखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रिडांगणात याच काळात होत आहे. दुहेरी महाराष्ट्र केसरी विजेते शिवराज राक्षे यांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती. स्पर्धेच्या आधी शहरातून निघालेल्या कुस्तीपटूंच्या रॅलीने ब्रम्हपुरी शहर दुमदुमून गेले. राज्यभरातील 600 महिला कुस्तीपटुंचा स्पर्धेत सहभाग असून विजेत्यांना लाखोंची बक्षीसे दिली जाणार आहेत. एकूण 3 दिवस ही स्पर्धा चालणार असून शिक्षण नगरी अशी ओळख असलेल्या ब्रम्हपुरी शहरात क्रीडा नैपुण्य वाढ व विशेषतः कुस्तीगीर निर्माण करण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. पुढील वर्षी पुरुष महाराष्ट्र केसरी स्पर्धा देखील ब्रह्मपुरी शहरात आयोजित करण्याचा मानस विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उद्घाटन प्रसंगी बोलून दाखविला.