नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
सांगली/प्रतिनिधी – आपल्या अपयशाचे खापर अनेक जण नशिबावर फोडतात. मात्र जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर खडतर परिस्थितीवर मात करून काहीजण समाजात आपला वेगळा ठसा उमटवतात. अभ्यासापासून दूर पळणारे विद्यार्थी अनेक कारण सांगतात, पण हेच कारण कोणासाठी तरी यशाचे दार उघडते याची प्रचिती बिरजू गोपाल चौधरी यांच्या आभाळा एवढ्या यशाने येते. यूपीएससी परीक्षेत दुसऱ्याच प्रयत्नात बिरजूने मिळवले असून तो आता आयकर विभागामध्ये आयकर निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.
२०२३-२४ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून देशात १८७ व्या रैंकने उत्तीर्ण झालेला बिरजू चौधरी हा एका मजुराचा मुलगा. पोटाची खळगी भरण्यासाठी बिरजूचे कुटुंब राजस्थानमधील कोटा येथून सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात आले. बिरजूचे बालपण हे दहा बाय दहाच्या भाड्याच्या घरात गेले. बिरजूची आई चंदा मजुरी तर वडील गोपाळ हे मार्बल तसेच फरशी बसवण्याचे काम करायचे. आई वडिलांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मजुरीतून घर चालायचे. पोराच्या शिक्षणाचा खर्च पेलणार नाही हे माहित असल्यामुळे गोपाल चौधरी यांनी बिरजूला शिराळा येथील सद्गुरु आश्रमशाळेत दाखल केले. बिरजू चुणचुणीत आणि हुशार आहे हे शिक्षकांनी लगेच जाणले. हलाकीच्या परिस्थितीमुळे बिरजूचे शिक्षण थांबणार नाही याची दक्षता शाळेने घेतली. आपल्या यशामध्ये सद्गुरु आश्रमशाळेचे तसेच सर्व शिक्षकांचे मोठे योगदान आहे. शाळेचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही. शाळेतच माझा पाया भक्कम झाला आणि मला योग्य दिशा मिळाली, अशी भावना बिरजू गोपाळ चौधरी यांनी पत्रकाराशी बोलताना व्यक्त केली.
बिरजू चौधरी लहानपणापासून शांत, संयमी आणि आज्ञाधारक होता. शाळेत प्रवेश घेतल्यानंतर बिरजूला भाषेची अडचण होती, मात्र अवघ्या काही महिन्यांतच त्याने मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवले. प्रत्येक इयत्तेत तो पहिल्या तीन क्रमांकात असायचा. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्याने आश्रमशाळेतच पूर्ण केले. दहावीतही ९३ टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. खडतर परिस्थितीत त्याने मिळवलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी होते. आम्हाला त्याचा अभिमान आणि त्याची प्रेरणा इतरही विद्यार्थ्यानी घेतली पाहिजे असे मत प्राथमिक शिक्षक सद्गुरु जंगली महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव एकनाथराव जाधव, सहसचिव सत्यजित जाधव आणि सर्व शिक्षकांनी व्यक्त केले. तसेच बिरजूला त्याच्या भावी आयुष्यासाठी शिक्षकांनी शुभेक्छा दिल्या.