नेशन न्यूज मराठी टिम.
संभाजीनगर/प्रतिनिधी – मोबाइल शॉपी फोडणारे विद्यार्थ्यांना त्यांच्याच पालकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पॉकेटमनीच्या पैशांतून दोन जिवलग मित्रांनी यथेच्छ दारू रिचवली. त्यानंतर कुटुंबाने घेऊन दिलेल्या स्पोर्ट्स बाइकवरून जालन्याहून शहरात आले. नशेत मोबाइल दुकानही फोडले. वृत्तवाहिन्यांवर घटनेचे वृत्त सीसीटीव्ही फुटेज झळकले.
सुशिक्षित कुटुंबातील मुलांच्या पालकांपर्यंत ते पोहोचले आणि आपल्याच मुलांचे चोर म्हणून छायाचित्र पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर कॅनॉट प्लेसमधील मोबाइल शॉपीच्या चोरीत अभिषेक राजू रिढे आणि आदित्य अनिल उघडे हे चोर असल्याचे निष्पन्न झाले. पालकांनी स्वत:हून सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्याशी संपर्क साधून मुलांना त्यांच्यासमोर हजर केले आहे. नशेसाठी हे विद्यार्थी चोरी करत असल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.