नेशन न्युज मराठी टिम.
कल्याण/प्रतिनिधी – भारतीय संस्कृतीला अभिजात असा लोककलेचा वारसा लाभला आहे. जो आपण सर्वांनी जपला पाहिजे. लावणी ही लोककला महाराष्ट्राची शान आहे. ती अजिबातच व्हलगर नाही. त्यामुळे लोककलावंतच नाही; तर लावणीचं सादरीकरण करणाऱ्या प्रत्येकाने तिचं पावित्र्य अबाधीत ठेवून सादरीकरण केलं पाहिजे. म्हणजे लावणीची शान वाढेल, “असे वक्तव्य लोककला अभ्यासक आणि ‘लावणी’ या लोककलेचे अभ्यासक, लेखक भूषण कोरगांवकर यांनी केले. मिरीयार्ड आणि मुद्रा आर्ट आयोजित ‘वारसा संस्कृतीचा २०२२’ या लोककला महोत्सवाचे सहावे पर्व २ ऑक्टोबरला ठाण्यातील ‘डाॅ. काशिनाथ घाणेकर सभागृहात पार पडले.
त्याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे लावणी नृत्यांगना आणि अभ्यासक गौरी जाधव-मांजरेकर, अभिनेते जयदीप सिंग, कथ्थक नृत्यांगना निधी प्रभूज्ञतसेच महोत्सवाचे परीक्षक कथ्थक नृत्यांगना आणि लोककला कलाकार प्रा. सुखदा खांडगे, बैठकीची लावणी सादर करणारे पुरुष लावणी नर्तक अश्मीक कामठे आणि लोककलेचे प्राध्यापक मदन दुबे तसेच सेलिब्रिटी होस्ट कथ्थक नृत्यांगना सुकन्या काळण मान्यवर उपस्थित होते. गौरी जाधव-मांजरेकर, जयदीप सिंग यांचाही महोत्सवात विशेष सत्कार करण्यात आला.
‘वारसा संस्कृतीचा २०२२’ लोककलेचे सहावे पर्व अतिशय जल्लोषात आणि उत्साहात पार पडले. ‘कोरोना’ या साथीच्या महामारीनंतर जवळ जवळ दोन वर्षांनी ‘वारसा’ ऑफलाईन होत असल्यामुळे महोत्सवाचे आयोजक, प्रायोजक, परीक्षक आणि स्पर्धेक यांच्यातील उत्साह दांडगा होता. ‘वारसा २०२२’मध्ये आपल्या कलेचं सादरीकरण करण्यासाठी यंदा फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर मध्यप्रदेश, गोवा, दिल्ली, सिंगापूर, कॅनडामधून प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून काही निवडक स्पर्धकांची निवड ‘वारसा २०२२’ या महोत्सवासाठी झाली. महोत्सवात प्रथम क्रमांक वसईच्या ‘नागबादेवी कलामंच’ या ग्रुपने लोकनृत्यासाठी पटकावला. दुसरा क्रमांक ‘कलामय’ या संस्थेने लोकनाट्यासाठी पटकावला. तर तिसरा क्रमांक तेजस पाटील या स्पर्धकाने ‘बासरी’ याज्ञलोकवाद्यासाठी पटकावला. ‘वारसा २०२२’मध्ये दोन विशेष पुरस्कार देण्यात आले. पहिला पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील सृष्टी उदमले या ८वर्षांच्या मुलीला लावणीसाठी दिला; तर दुसरा पुरस्कार मुंबईच्या ‘न्यासा म्युझिक ग्रुप’ने ‘पनवा’ या उत्तर भारतीय लोक गायनासाठी पटकावला. या महोत्सवाचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आणि सेलिब्रिटी सूत्रसंचालक सुकन्या काळण हिने केलं.
‘वारसा २०२२’ला प्रेक्षक आणि स्पर्धकांचा वाढता प्रतिसाद पाहता २०२३ पासून वारसाचा एक कार्यक्रम मुंबई प्रमाणे मध्यप्रदेशमध्ये करत असल्याची घोषणा स्पर्धेचे प्रमुख आयोजक श्रेयस देसाई यांनी केली. त्यामुळे २०२३ पासून महाराष्ट्राप्रमाणे महाराष्ट्राबाहेर होणार आहे. ‘वारसा २०२२’चं प्रायोजकत्व ‘द केकवाली’ आणि ‘मातोमातो’ यांनी केलं होतं.