नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
रत्नागिरी/प्रतिनिधी – शैक्षणिक जीवनात बारावीची बोर्ड परीक्षा (HSC) ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्वाची असते. कारण 12 वी नंतर विद्यार्थ्यांचे भविष्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल पुढे पडते. दिवस-रात्र अभ्यास करून राज्यातील लाखों विद्यार्थी ही परीक्षा देतात. यात काही विद्यार्थ्यांना यश मिळते तर काहींच्या पदरात अपयश पडते.
एचएससी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, कोकण बोर्डाने पुन्हा एकदा निकालामध्ये बाजी मारली आहे. कोकण बोर्डाचा निकाल 97.51 टक्के लागला आहे. कोकण बोर्डामध्ये यावर्षी 12 वीच्या परीक्षेसाठी एकूण 25 हजार 793 विद्यार्थी बसले होते. यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील 16 हजार 721 विद्यार्थी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 9 हजार 72 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे 96.42 टक्के आहे, तर मुलींचं उत्तीर्ण प्रमाण 98.60 टक्के आहे अशी माहिती कोकण बोर्डाच्या सचिव सुवर्णा सावंत यांनी दिली आहे.