नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
जळगाव/प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात दरोडा टाकण्याच्या इराद्याने आलेल्या दरोडेखोरांचा डाव धुळे स्थानिक गुन्हे शाखेने उधळला. मात्र, टोळीतील चार सदस्य पसार होण्यात यशस्वी झाले. परंतु, एक अल्पवयीन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागल्याने तब्बल १० गुन्ह्यांची उकल झाली आहे. धुळे पोलिसांच्या कारवाईत एक वाहन, पिस्टल आणि दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
धुळ्यातील गरताड बारी येथे पाच जणांची टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच तेथे पोलिसांचे पथक पोहचले. मात्र, पथकाला बघून टोळीतील चौघांनी पळ काढला. मात्र, एक अल्पवयीन गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला, त्यानंतर दरोड्याचा प्लॅन उघड झाला झाला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. सदर टोळीने याआधी जळगाव जिल्ह्यातील कसाव येथे दरोडा टाकण्याचा प्लॅन केला होता. मात्र, एलसीबीच्या कारवाईने हा डाव उधळला गेला, पोलिसांनी अल्पवयीन
बालकाची चौकशी केली असता त्याने दरोड्याचा पूर्ण प्लान पोलिसांना सांगितला. तसेच त्याच्या इतर साथीदारांचे नाव सांगितले. यात वरूनसिंग टाक, रा. दाहोद, गुजरात, मुकुंदर जुनी, आकाश मांग दोघे नंदुरबार, वरुणसिंग टाकचा मित्र यांच्यासोबत तो दरोडा टाकणार होता. शिवाय त्याने अन्यत्र केलेल्या चोऱ्या, घरफोडींचीही माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
या टोळीने दि.३१ जानेवारी रोजी कोळगाव, ता. भडगाव येथून एक कार चोरली. तसेच गोंडगाव, ता. मडगाव येथे दि.१ व २ फेब्रुवारी रोजी रात्री मेडिकल दुकान फोडून रोकड लांबविली होती. चोरीच्याच कारने ते चाळीसगाव तालुक्यातील मऊर गावाकडे जात असताना पेट्रोल संपल्याने ती कार तेथेच सोडली त्यानंतर या टोळक्याने बहाळ गावातून आल्टो कार चोरली. याच वाहनाने ते दरोडा टाकायला निघाले होते. शिवाय या टोळक्याकडे एक दुचाकीही मिळून आली.
हे दरोडेखोर चोरीच्या गाडीने धुळ्यात दरोडा टाकण्यासाठी येत होते अशी प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली, मात्र रात्रीच्या वेळी पोलिस गस्त घालत असताना त्यांना काही जण बंद पडलेली गाडीला धक्का मारताना संशयीतरित्या आढळून आले. पोलिसांना बघताच चारही दरोडेखोरांनी त्या ठिकाणाहून पळ काढला मात्र एक अल्पवयीन मुलगा यावेळी पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्यांनी दरोडेखोरांचा सगळा प्लॅन पोलिसांना सांगितला.