नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
यवतमाळ/प्रतिनिधी – गुन्हा हा लहान असो किंवा मोठा त्याचे परिणाम हे भयानकच असतात. अनेकदा यात निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागतो. वणी तालुक्यातून असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी तालुक्यातील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांना यश मिळाले आहे. चौकीदाराचा खून करणाऱ्या मारेकऱ्याला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
या प्रकरणात पोलिस बऱ्याच दिवसांपासून आरोपीच्या शोधात होते. कारण आरोपींनी खून केल्यानंतर कोणतेही पुरावे मागे सोडले नव्हते. त्यांनी अतिशय सराईतपणे चौकीदाराची हत्या केलेली. आरोपींनी कुठलाही पुरावा मागे न सोडल्यामुळे पोलिसांना कोणताही क्लू मिळत नव्हता जो त्यांना आरोपींपर्यंत घेऊन जाईल. पण स्थानीय लोकांच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या 18 दिवसानंतर आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अजीम रमजान शाह (35) ,मुहम्मद उमर अब्दुल घणी (36) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी वाशिम जिल्ह्याचे रहिवासी आहेत. आरोपी अजीम रमजान शाह याचा भंगार व जुने टायर खरेदी-विक्रीचा धंदा असून त्याच्यावर कारंजा व नागपूर येथे अनेक गुन्हे दाखल आहे. आरोपी रात्रीच्या वेळेस वणी येथील गोदामाबाहेर लोखंडी सळई चोरत असताना तिथला चौकीदार जीवन झाडे याला जाग आली. त्यावेळेस त्याने चोरट्याचा विरोध केला असता आरोपींनी जीवन झाडे याच्या डोक्यावर व पोटावर लोखंडी रॉडने प्रहार केला. या हल्ल्यात चौकीदार जीवन झाडे यांचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोडे यांनी दिली आहे.