नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
यवतमाळ/प्रतिनिधी – पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या लोकांचा मोठा समूह आहे. अघोरी कृत्य करून सहज आणि कमी वेळात प्रसिद्धी तसेच पैसा मिळविण्यासाठी काहीजण प्रयत्न करतात. साडेतीन मुहूर्तापैकी महत्वाचा मानला जाणार मुहूर्त अक्षय तृतीया हा नुकताच झाला. या मुहूर्ताची वाट काही अंधश्रद्धाळू लोक वर्षभर पाहत होती. कारण या दिवशी गुप्तधन प्राप्त होत असल्याची काहींची मान्यता आहे.
यवतमाळ येथील उमरखेड तालुक्यातील ढाणकी या शहरात मागील काही दिवसांपासून गुप्तधन काढण्याचे प्रमाण वाढले होते. अशातच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काही लोक गुप्तधन काढत असल्याची माहिती शहरातील बिटरगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणेदार प्रेमकुमार केदार यांनी गणेश मामीलावाड यांच्या शेतात छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी जीवन गोविंद जाधव (वय 25वर्षे रा. टेंभुरदरा), संतोष हरीसिंग राठोड (वय 48वर्षे रा बाळदी), अभिजीत गणेश मामीलवाड (वय 25 वर्षे रा ढाणकी), सर्वजीत कांनबा गंगनपाड (वय 25 वर्ष ढाणकी), पंडित विश्वनाथ राठोड (वय 45वर्षे रा चिल्ली) या पाच जणांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अटक या केलेल्या आरोपींकडून पाच मोबाईल, तीन मोटरसायकल, डीप सर्च मेटल डिटेक्टर, चाकू असा एकूण 2 लाख 8 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दत्ता कुसराम यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.