नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
डोंबिवली/प्रतिनिधी – गुन्हेगारी क्षेत्रात जाणे जितके कठीण आहे तितकेच त्यातून बाहेर येण्याचा मार्ग देखील अवघड आणि अशक्य आहे. असच काहीसं कल्याणातील एका चोरटयासोबत घडलं आहे. कारण २ वर्षांनी कारागृहातून सुटका झाल्यानंतर देखील त्याला चोरी करण्याचा मोह आवरला नाही.
भर रस्त्यात चैन स्नेचिंग करणाऱ्या सराईत चैन स्नेचरला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रभात सिंग उर्फ मदन सिंग जुनी असे या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. प्रभात सिंग वर विविध पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. आरोपी प्रभात सिंग हा कल्याणातील टिटवाळा परिसरातील रहिवासी आहे.
प्रभातने चैन स्नेचिंग करण्यासाठी वाशिंद येथून बाईक चोरी केली होती. त्यानंतर प्रभात ने कल्याण ,डोंबिवली, विरार भागात चैन स्नेचिंगचा धडाका लावला. डोंबिवलीमध्ये झालेल्या चैन स्नेचिंगच्या गुन्ह्यात मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख पटवून सापळा रचत प्रभातला बेड्या ठोकल्या. तसेच आरोपीकडून नवीन खुलासे होऊ शकतील असे मत मानपाडा पोलिस ठाण्याचे एसीपी सुनील कुराडे यांनी व्यक्त केले. सराईत गुन्हेगार असलेला प्रभात दोन वर्षांपूर्वी हत्येच्या गुन्ह्यातून जामिनावर जेलमधून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने परत गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकले आणि चैन स्नेचिंग सुरू केली.