महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
महाराष्ट्र मुख्य बातम्या

मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी पुढील निर्णय- मुख्यमंत्री

प्रतिनिधी.

मुंबई – राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत.ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी  राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोरोनाचे संकट मोठे असून या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक शासनासोबत असल्याचे समाधान वाटते. आजही कोविडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही त्यामुळे कोरोनासोबत जगताना अत्यंत काळजीपूर्वक पुढे जावे लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोविड लक्षणे दिसून येत आहेत. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते एकेक सुरु करत आहोत. काही व्यवहार बंद ठेवल्याने कर रुपात राज्य शासनाला मिळणारा महसूलही बंद आहे. केंद्र शासनाकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे.  या सर्व आर्थिक अडचणींची शासनास जाणीव आहे म्हणूनच मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेवून व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी… तशीच तुमचीही…

राज्य शासनाने ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ हे अभियान राबविण्यास सुरुवात केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, अवघा महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकांसाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे.

कोविडमुळे कोरोना योद्धेही बाधित झाले आहेत, दुर्देवाने काही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जी गोष्ट आपण सुरळीत करू ती अतिशय काळजीपूर्वक, जबाबदारीचे भान ठेवून सुरु करत आहोत. त्याचदृष्टीने रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी एसओपी तयार करण्यात आली असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.

जीवनशैलीत बदल करणे आवश्यक

आता सण उत्सव आणि पावसाचे दिवस आहेत. गर्दी टाळणे गरजेचे आहे. लोकांचा संयम हा देखील महत्त्वाचा विषय आहे. पण कोरोनासोबत जगताना आता आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे.  मास्क लावणे, हात धुणे,  शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरंट सुरु करताना या तीनही गोष्टीची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणे महत्त्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करा

या विषाणूने बाधित ८० टक्के लोकांना लक्षणे दिसून येत नसली तरी त्यांच्याकडून विषाणूचा प्रसार होऊ शकतो हे गंभीर असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसिपी आहे. आपले नाते विश्वासाचे असल्याचे सांगताना महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेवून यात सहभागी होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सर्व संबंधितांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी फायनल करू असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.

बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, गुलबक्षसिंह कोहली, महाराष्ट्र हॉटेल फेडरेशनचे सतीश शेट्टी, प्रदीप शेट्टी, दिलिप दतवाणी, रियाझ अमलानी, प्रणव रुंगटा, सुकेश शेट्टी, एस. के.भाटीया आदी मान्यवर उपस्थित होते.

Translate »
×