नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – दिवसेंदिवस पर्यावरणपूरक सणांचा आनंद घेणे याचे महत्व लोकांना पटू लागले आहे. म्हणूनच आता शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीला प्राधान्य देत आरास देखील इको फ्रेंडली करण्याकडे घरगुती व सार्वजनिक गणपती उत्सव मंडळांचा कल वाढत आहे. मुंबईत देखील अनेक मंडळ अनेक नवीन नवीन संकल्पनेचा वापर करून पर्यावरणपूर्वक आणि संदेशात्मक बाप्पाचे मूर्ती आणि देखावे बनवून भक्तांचे लक्ष वेधत आहे. मुंबई भायखळा येथे अशीच एक इको फ्रेंडली गणेश मूर्ती गणेशभक्तांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे.
भायखळा येथील मकबा चाळ गणेशउत्सव मंडळाने कडधान्यांचा वापर करून साकारलेल्या इको फ्रेंडली बाप्पाच्या मूर्तीचे स्वागत केले आहे. या बाप्पाचे रूप तयार करण्यासाठी ज्वारी,बाजरी,मक्का, नाचणी इत्यादी कडधान्यांचा वापर करण्यात आला. एकूण ४५ किलो कडधान्यांचा वापर करून या मूर्तीचे रूप उभारण्यात आले आहे. गेल्या २५ वर्षापासून हे मंडळ अनेक प्रकारचे इको फ्रेंडली संकल्पना साकारून भक्तांपर्यंत संदेश पोचवत असतात.
अपुरा पाऊस अन त्यामुळे निर्माण झालेली दुष्काळग्रस्त परिस्थिती याचा परिणाम म्हणून शेतकरी पिकांचे नुकसान झाल्याने आत्महत्या करत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना वाचवणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळणं गरजेचे आहेत. त्यांना मदत झाली पाहिजे हा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यत या देखाव्याच्या माध्यमांतून देण्याचे प्रयत्न मंडळाकडून केला जात आहे..या संकल्पनेला गणेश भक्तांनचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.