नेशन न्यूज मराठी टीम.
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी– सुप्रसिद्ध अभिनेते अमीर खान यांनी पाणी फाऊंडेशन या संस्थेअंतर्गत 2016 साली सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा सुरु केली होती व 2017 साली खुलताबाद तालुक्यात देखील ही स्पर्धा सुरु झाली तेव्हा असंख्य गावाबरोबरच गोळेगांव ने देखील या स्पर्धेत सहभाग घेऊन सतत तीन वर्ष 45 दिवस प्रत्येक वर्षी 41 डीग्री सेल्सीअस मध्ये श्रमदान तसेच यंत्राद्वारे 1019.57 हेक्टर क्षेत्रावर माथा ते पायथा जलसंधारणाचे विविध उपचार केले. त्यामुळे पानी फाऊंडेशन व महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार तर मिळालाच पण सर्वात मोठा पुरस्कार निसर्गाने पाण्याच्या रूपात दिला आहे .
गावाची भुजल पातळी वाढली, गांव टँकरमुक्त झालं, गावाच्या पाणीपुरवठ्याच्या ज्या विहिरीत डिसेंबर महिन्यात टँकरने पाणी टाकावं लागायचं त्याच विहिरीत मे महिन्यात 45 फूट पाण्याची पातळी होती.गावात पाणी आलं तशी शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी देखील यावी या हेतूने पानी फाऊंडेशन ने सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा -2022 सुरु केली. 39 तालुक्यातील वॉटर कप मध्ये छान काम करणाऱ्या निवडक गावातील शेतकरी मित्र -मैत्रिणींना या स्पर्धेत सहभाग घेता येणार होता. स्पर्धेसाठी प्रशिक्षण हजारो शेतकरी मित्र -मैत्रिणींना देण्यात आले व नंतर गांवा गावात शेतकरी गटांची बांधणी झाली. त्या शेतकरी गटांची ऑनलाईन नोंदणी झाली. 39 तालुक्यातून 1500 पेक्षा जास्त शेतकरी गटांनी नोंदणी केली होती. चित्रा नक्षत्र महिला शेतकरी गट शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मे,2022 ला शेवटच्या क्षणाला स्थापन करून नोंदणी झाली. मग स्पर्धेला सुरुवात झाली.
अनेक अडचणींवर मात करत महिला स्पर्धा समजून घेत काम करत होत्या. एक तर स्पर्धेबाबत एकाही महिलेने प्रशिक्षण घेतले नव्हते. पण स्पर्धेत काम करायचे तर प्रशिक्षण खूप महत्वाचे म्हणून संतोष जोशी, उपसरपंच यांनी पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक यांच्याशी चर्चा करून महिलांच्या वेळेनुसार संध्याकाळी गोळेगांव ग्रामपंचायत कार्यालयाच्या हॉल मध्ये प्रशिक्षण आयोजित केले. महिलांना प्रशिक्षण खूप आवडले. त्यांनी प्रशिक्षकांना विविध प्रश्न विचारून समजून घेतले… पण शेतात वस्ती करून राहणाऱ्या महिलांना घेण्यासाठी बाहेर पती आले होते. ते कंटाळले.. रात्री 11:30 चे 12 वाजले काही महिलांचे पती चिडले व घरी गेल्यावर ते पत्नीला म्हणाले की काही जायचं नाही शेतकरी गटात इतका वेळ लागणार असेल तर घरची कामं कोण करणार?पण महिलांनी स्पर्धा समजून घेतली होती.त्यांना स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ठ काम करून दाखवायचंच होतं व त्यासाठी त्यांनी सर्व त्रास सहन करून प्रत्येक अडचणींवर मात करायची असं ठरवलं होतं.. त्यामुळे त्यांनी सर्व गोष्टी शांततेत व योग्य पद्धतीत हाताळण्यास सुरुवात केली.
26 महिलां सतत 10 महिन्यांपासून एकजुटीने शेती करत आहेत हे करत असताना. पानी फाऊंडेशन आयोजित डिजिटल शेतीशाळा द्वारे दर आठवड्याला विविध कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ शेतीविषयक ज्ञान देत होते. सर्व महिला कधी एकत्र बसून तर कधी आपापल्या मोबाईलवर झुम द्वारे शेती शाळेला न चुकता उपस्थित राहत असत. त्यांना पडलेले प्रश्न शंका विचारून आपले समाधान करून घेत योग्य व्यक्तींकडून ज्ञान घेऊन एकजुटीने एकविचाराने शेती केल्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळू शकते हा विश्वास सर्वच महिलांना स्पर्धेमुळे मिळाला होता.एस. ओ. पी. म्हणजे काय असतं? हे अगोदर माहीत नव्हतं पण आता एस. ओ. पी.म्हणजे स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस म्हणजेच शेती करण्याच्या मानक पद्धती होय.
नांगरणी शेणखत जमीनी आड करणे, एकच वाण निवडून एकत्र निविष्ठा खरेदी करणे, उगवण क्षमता तपासणे, बीजप्रक्रिया करणे, माती परीक्षण करणे, रिपोर्ट नुसार खत व्यवस्थापन करणे, दशपर्णी निमार्क व इतर नैसर्गिक पद्धतीत फवारण्यांचा व जैविक कीड नियंत्रणाच्या पद्धतींचा अवलंब करणे, ज्यामध्ये शेतात पक्षी थांबे लावणे, पिवळे निळे चिकट सापळे, कामगंध सापळे, प्रकाश सापळे लावणे, निंदणी खुरपणी, डवरणी, वखरणी वेळेवर करणे, इर्जिक म्हणजेच आवड -सावड द्वारे एकमेकांच्या शेतात जाऊन काम करणे ज्यामुळे मजुरांची समस्या सहज सुटली.
अशा प्रकारच्या अनेक एस.ओ. पी. चा अवलंब गटातील प्रत्येक सदस्यांनी केला.. त्याच बरोबर दुसऱ्या शेतकरी गटास सहकार्य करणे…बरीच कामे आम्ही व भरणी नक्षत्र पुरुष शेतकरी गटाने मिळून केली उदाहरणार्थ:- 2000 लिटर दशपर्णी बनविणे, वृक्षारोपण करणे, वनराई बंधारा बनविणे सामाजिक कार्य करणे ज्यामध्ये वृद्धाश्रमास भेट देणे,गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार कार्यक्रम राबविणे, नवीन लग्न होऊन गावात सून म्हणून आलेल्या मुलींसाठी आमची सून आमची मुलगी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा -2023 बद्दल माहीती देऊन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले व एस. ओ. पी. च्या माहीती पत्रकाचे वाण दिले अशी अनेक कामे करण्यात आली तसेच गावात पहिल्यांदाच कृषी सप्ताह साजरा करण्यात आला व आधुनिक कृषी तंत्रज्ञान महिला सक्षमीकरण दिन साजरा करण्यात आला व या दिवशी गावातून कृषी अवजारे हातात घेऊन व कृषी संबंधित बॅनर घेऊन घोषणा देत कृषी दिंडी काढण्यात आली व नंतर कृषी आवजारे व नंदी, गाय, वासरू यांची पूजा करण्यात आली… नंतर महिलांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान विषयी माहीती देण्यात आली..या फार्मर कप स्पर्धे दरम्यान उत्तम शेती करण्याबरोबरंच, शेतीचा जमा खर्च लिहून ठेवणे. विहिरीची पाणी पातळी मोजणे प्रत्येक गोष्टीचे एकत्रित नियोजन करून एकजुटीने व जबाबदारीने कामे करणे याबरोबरच आपले गावाच्या प्रति सामाजिक, निसर्ग व पर्यावरणाच्या प्रति असलेले दायित्व पार पाडण्याची समज या स्पर्धेमुळे आली.
जे पुरुष अगोदर आपल्या पत्नीला शेतकरी गटात नाही जायचं असं ओरडत होते त्याच पुरुषांना नंतर महिला करत असलेले काम योग्य आहे असा विश्वास वाटू लागला व त्यांचे मन परिवर्तन झाले मग तर ते स्वतः पत्नीला मीटिंगसाठी आनंदाने घेऊन येऊ लागले.या स्पर्धेत सर्वांचे आपसात प्रेम वाढले, एकोपा वाढला कमी खर्चात उत्पन्न वाढले आत्मविश्वास वाढला आणि महिलांना आम्हीही शेतकरी आहोत असा सन्मान गावातच नाही तर महाराष्ट्रात मिळाला.
ही स्पर्धा 200 मार्काची होती त्यापैकी 190 मार्काची कामे गटाने पानी फाउंडेशनने सांगितलेल्या ऍप मध्ये भरायचे होते.त्या सर्व बाबींचे पानी फाउंडेशनच्या प्रतिनिधिंनी निष्पक्षपणे व्हेरीफिकेशन केले होते नंतर गटाचे ऑनलाईन(झूम द्वारे) जजिंग करण्यात आले.. या सर्व प्रक्रियेनंतर राज्यात दहा गट निवडले गेले… व त्या दहा गटांचे गावात जाऊन तीन परीक्षकांनी जजिंग केले. ते परीक्षक होते. पोपटराव पवार,. डी. एल. मोहिते कृषी अधिकारी, महाराष्ट्र शासन व भोसले सह्याद्री कंपनीचे प्रतिनिधी या तिघांनी महाराष्ट्रातील टॉप टेन मध्ये आलेल्या दहा गावांचे जजिंग करून 10 पैकी गुण दिले व मग 200 पैकी ज्या गावांना जास्त गुण मिळाले त्यांची प्रथम, द्वितीय व तृतीय अशी निवड करण्यात आली.
त्यात खुलताबाद तालुक्यातील गोळेगांव येथील चित्रा नक्षत्र महिला शेतकरी गट पीक – कापूस यांना राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला. ट्रॉफी व 15 लाख रुपये असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.स्पर्धेच्या या पुरस्कारात सर्वात मोठा वाटा सर्व 26 महिलांचा तर आहेच पण त्याच बरोबर ज्ञान देणारे सर्व शास्त्रज्ञ,डी. एल. मोहिते सर,पानी फाउंडेशनची सर्व टीम, तालुका समन्वयक ज्ञानेश्वर इधाटे, जिल्हा समन्वयक प्रल्हाद अरसूळ, तांत्रिक प्रशिक्षक प्रशांत गवंडी,कृषी विज्ञान केंद्र, गांधेली येथील शास्त्रज्ञ तुषार चव्हाण, शरद अवचट व .स्वप्निल वाघ,भरणी नक्षत्र पुरुष शेतकरी गटातील सदस्य, गोळेगांव ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच,सदस्य, कर्मचारी व ग्रामसेवक ,अनिल कांताराम चव्हाण,जि. प.उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक व विद्यार्थी तालुका कृषी अधिकारी श्री. शिरीष घनबहाद्दूर, कृषी साहाय्यक सौरभ पाटील, गायत्री परिवारचे राजेश भैया टांक, श्री.प्रशांत अवसरम, कृषी तज्ज्ञ देवळाणकर, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी वैजनाथ हांगे, सेवक ट्रस्ट, इंड्युरन्स कंपनी आणि प्रमुख मार्गदर्शक संतोष जोशी या सर्वांनी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले.
या पुरस्कारामुळे महिलांना त्यांनी केलेल्या कष्टाचं चिज झालं असं वाटतंय.. खरोखर महिलांच्या गेल्या दहा महिन्याच्या प्रवासाबद्दल विचार केला तर खूप कष्ट त्यांनी घेतले सकाळी उठून घरातली सगळी कामे उरकून शेतात जायचंशेतात कामं करायची.. संध्याकाळी घरी यायचं चहापाणी आटोपलं की स्वयंपाक मग सर्वांची जेवणं सर्वात शेवटी महिला जेवणार मग मीटिंग नियोजन घरातली कामं शेतातली कामं शेतकरी गटाची मीटिंग व कामे असं सातत्याने नऊ दहा-महिने महिला करत होत्या आता त्यांची जबाबदारी अजून वाढलीये आता पुढील उज्वल भविष्याचे नियोजन व त्याप्रमाणे कामं तर करायचंच आहे त्याच बरोबर जास्तीत जास्त शेतकरी मित्र मैत्रिणींना फार्मर कप स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी प्रेरणा द्यायची आहे अशी माहिती संतोष जोशी यांनी दिली.