नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
मंगोलिया– कपिलवस्तू येथे असलेले भगवान बुद्ध यांचे पवित्र अवशेष 11 दिवसांच्या प्रदर्शनात मांडण्यासाठी आज मंगोलिया येथे पोहोचले. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजीजू यांच्या नेतृत्वाखालील 25 सदस्यांचे एक प्रतिनिधीमंडळ या अवशेषांसोबत मंगोलिया येथे गेले आहे. अत्यंत आदरयुक्त आणि उत्सवी वातावरणात मंगोलियाच्या सांस्कृतिक मंत्री चे नॉमिन, भारत मंगोलिया मैत्री गटाच्या अध्यक्ष आणि खासदार सरनचीमेग, मंगोलियाच्या राष्ट्रपतींचे सल्लागार खांबा नोमून यांनी इतर मान्यवर तसेच मोठ्या संख्येने उपस्थित धर्मगुरू यांच्यासह उलानबातर आंतरराष्ट्रीय विमानतळावर या अवशेषांचा स्वीकार केला.
या प्रसंगी बोलताना, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजीजू म्हणाले की, या पवित्र अवशेषांचे भारतातून मंगोलिया येथे आगमन झाल्यामुळे या दोन्ही देशांदरम्यानचे ऐतिहासिक संबंध आणखी दृढ होतील.भारत एक प्रतिनिधी म्हणून भगवान बुद्धांचा संदेश जगापर्यंत पोहोचवीत आहे असेही त्यांनी सांगितले.
मंगोलिया येथील गंदन मठातील भगवान बुद्धांची मुख्य मूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2015 मध्ये मंगोलियाच्या जनतेला उपहार म्हणून दिली होती आणि वर्ष 2018 मध्ये सध्याच्या ठिकाणी या मूर्तीची स्थापना करण्यात आली अशी माहिती देखील केंद्रीय मंत्री रिजीजू यांनी उपस्थितांना दिली.
मंगोलियामधील लोकांचे भारतीयांशी एक विशेष दृढ नाते आहे आणि हे लोक भारताला ज्ञानाचा स्त्रोत म्हणून मान देतात असे देखील ते म्हणाले. मंगोलियाच्या जनतेच्या हृदयात आणि मनात भारताला एक विशेष स्थान आहे असे रिजीजू यांनी पुढे सांगितले.
विमानतळावरून निघाल्यानंतर, प्रार्थना तसेच बौद्ध मंत्रोच्चारांच्या घोषात उत्सवी वातावरणात गंदन मठात या पवित्र अवशेषांचे स्वागत करण्यात आले. भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांना आदरपूर्वक नमन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मंगोलियन लोक या ठिकाणी जमा झाले होते. मंगोलिया येथे उद्यापासून सुरु होणाऱ्या 11 दिवसांच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर, हे पवित्र अवशेष सुरक्षितपणे जतन करण्यासाठी गंदन मठातील बौद्ध धर्मगुरूंच्या उपस्थितीत गंदन मठाच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आले.
नवी दिल्ली येथे काल संध्याकाळी पारंपरिक रितीरिवाज पूर्ण झाल्यानंतर या पवित्र अवशेषांना घेऊन केंद्रीय मंत्र्यांनी प्रतिनिधीमंडळासह भारतातून मंगोलियाला जाण्यासाठी प्रयाण केले. हे पवित्र अवशेष केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या 22 विशेष अवशेषांच्या संग्रहाचा भाग आहेत.