नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – आंतरराष्ट्रीय अपंग दिनाच्या पूर्वसंध्येला, भारतीय निवडणूक आयोगाने आज निर्वाचन सदन येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय मूकबधिर क्रिकेट संघाचा सत्कार केला. खेळाडूंनी दाखवलेल्या लवचिकता आणि दृढतेला निवडणूक आयोग सलाम करत असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी संघाचे स्वागत करताना सांगितले. कर्णबधिर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने संयुक्त अरब अमिरात येथे आयोजित कलेली टी – 20 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून संघाने देशाचे नाव उंचावले आहे. विजेत्यांना योग्य प्रसिद्धी प्रदान करणे महत्वाचे आहे असे कुमार यावेळी म्हणाले. भारतीय निवडणूक आयोग मुख्य प्रवाहातील क्रिकेट संघांसोबत भारतीय कर्णबधिर क्रिकेट असोसिएशन संघाचा सामना प्रायोजित करण्याची शक्यता तपासेल असे आश्वासन कुमार यांनी दिले.
निवडणूक आयोगाने आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त आयोगाच्या अधिकाऱ्यांसाठी, पद्मश्री पुरस्कार विजेते तसेच भारतीय निवडणूक आयोगाचे नॅशनल आयकॉन डॉ. नीरू कुमार यांच्या ‘विविधता आणि समावेश’ या विषयावर संवेदनशीलता प्रशिक्षण कार्यशाळाही आयोजित केली होती.दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही अडचणीशिवाय मतदान करता यावे म्हणून मतदान केंद्रांवर सर्व सुलभ सुविधा सुनिश्चित करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग अनेक उपाययोजना राबवत आहे.
निवडणूक आयोग सर्वसमावेशक आणि सुलभ निवडणुकांच्या उद्दिष्टासाठी समर्पित असून प्रातिनिधिक आणि मजबूत लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रियेत दिव्यांगांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत, देशभरातील मतदार यादीमध्ये 83 लाखांहून अधिक मतदारांना दिव्यांग म्हणून ओळखले गेले आहे.