कल्याण/प्रतिनिधी – डोंबिवली (Dombivali) एमआयडीसीतील अमुदान या कंपनीला लागलेल्या भीषण आगीत फक्त लोकांचा मृत्यूच झाला नव्हता तर एका क्षणात अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. २३ मे रोजी दुपारी झालेल्या स्फोटात (Explosion) एकूण १२ जण मृत्युमुखी पडले तर ६५ लोकांना यामध्ये दुखापत झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी अमुदान कंपणीचे मालक आणि मुख्य आरोपी मलय मेहता आणि स्नेहा मेहता यांना न्यायालयाकडून 29 मे पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती.
आज कल्याण कोर्टात मलय मेहता आणि स्नेहा मेहता या दोघांनाही हजर केले गेले. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. न्यायमुर्ती एस एस राऊळ यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ठाणे क्राईम ब्रांचने मलय आणि स्नेहा मेहता यांची २ दिवसांची पोलिस कोठडी वाढवून मागितली होती. मात्र कोर्टाने पोलिस कोठडी वाढवून न देता दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. अशी माहिती आरोपीचे वकील सम्राट ठक्कर यांनी दिली आहे.