नवी मुंबई/प्रतिनिधी – सीबीआयमध्ये अधिकारी असल्याचे सांगून दोघांना चुना लावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सीबीडी बेलापुर पोलीसांना काही दिवसांपूर्वी तक्रार आली होती. ज्यात स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत जमिनीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालण्यात आल्याची तक्रार करण्यात आलेली. या माहितीच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत होते.
सीबीआय विभागात तात्पुरता चालक असलेल्या व्यक्तीने स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे दोघांना सांगितले. तसेच कोल्हापूर मधील वन विभागाच्या पाचशे एकर जमिनीचे खोटे कागदपत्र त्याने तयार केले. या प्रकरणात आरोपीने दोघांची तब्बल 80 लाखांची फसवणूक केली आहे. ही घटना नवी मुंबईत घडली असून आरोपीचे नाव सुनील धुमाळ आहे. या आरोपीवर सीबीडी बेलापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोरे यांनी दिली आहे.