नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. त्यावर काल अखेर पडदा पडला. राज ठाकरे यांनी महायुतीला लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दर्शवला. “फक्त नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे” असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी लोकसभा लढवणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं.
महायुतीला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानंतर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “हिंदुत्वासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. मी त्यांचे स्वागत करतो. नरेंद्र मोदींचे नेतृत्व आणि देशाच्या विकासाच्या कामांना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. मी त्यांचे धन्यवाद करतो आणि अभिनंदनही करतो. राज ठाकरेंनी कुठलीही अट ठेवलेली नाही, मोदींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा दिला आहे.”
तसेच विधानसभेच्या निवडणुकीबद्दल प्रश्न विचरला असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले “राज ठाकरेंचा स्वतःचा पक्ष आहे. प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पहिला लोकसभेची निवडणूक तर होऊ द्या. पहिले लोकसभा आटपू द्या, मग विधानसभेचं पाहू. त्यांची सेना कुठली आहे? उठाबसा सेना? आमची शिवसेना बाळासाहेबांची आहे.बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. काँग्रेस प्रणित शिवसेना नाही. बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती आणि तिलांजली देणाऱ्यांचे काम तसेच सावरकरांचा अवमान करणाऱ्याचे काम आणि हा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये. तुम्ही मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेसाठी, स्वार्थासाठी, मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार विकले, धनुष्यबाण गहाण ठेवला आणि आम्हाला शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबवण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली.”
महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले,” पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही. नरेंद्र मोदींना भेकड म्हणणं त्यांना शोभत नाही. कारण कोरोना काळात देशात आणि वेदिशात जेव्हा वैक्सीनची गरज होती. मोदींनी पुढे येऊन मदत केली. तेव्हा आरोप लावणारे घरी बसून कोणते शौर्य दाखवत होते? जेव्हा कोरोनामध्ये लोक मरत होते, तेव्हा हे घरी बसून रोकड मोजत होते. मग त्यांना रोकड पक्षाचे अध्यक्ष म्हणावं का? रोकड मोजणाऱ्यांनी मोदींना भेकड म्हणू नये, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सभेसाठी येणार आहेत यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात अनेक सभा घेतल्या आहेत. त्यांचे पहिल्यापासून महाराष्ट्रावर प्रेम आहे. गेल्या दिड दोन वर्षात त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात विशेष योगदान देलेले आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा निवडून येणार, अशी गॅरंटी मतदारांनी मोदींना दिली आहे. 45 जागा जिंकून मोदींचे हात बळकट करू. महायुतीचे जागावाटपही लवकरात लवकर जाहीर होईल, अशी मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली.”
लोकसभा निवडणूकीला काही दिवसच शिल्लक आहेत. पण या आधीच महाराष्ट्राच्या राजकारनात उलथापालत पाहायला मिळतेय. जे पक्ष मोदींच्या विरोधात होते, आपल्या सभेत मोदींवर आणि बीजेपी वर भरभरून टीका करायचे तेच पक्ष आज मोदींना पाठिंबा देताना दिसत आहेत. त्यामुळे नक्की कुणावर विश्वास ठेवायचा ? कोणाला मत द्यायचे ? असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे.