नेशन न्युज मराठी टीम.
ठाणे – जिल्हा परिषदेच्या १३२८ शाळांमधील पहिले ते तिसरीच्या वर्गातील मुलांमध्ये भाषा आणि संख्याज्ञान आकलनाची क्षमता वाढावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत ‘उमंग अभियान’ राबविण्यात येणार आहे. १ जानेवारी २०२२ ते १० एप्रिल २०२२ या कालावधीत हे अभियान सुरु राहणार आहे. यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रहाटोली आणि सीखे संस्थेमार्फत शंभर दिवसांचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थांना कसा शिकवावा यासाठी शिक्षकांची कार्यशाळा २७ डिसेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत संपन्न होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या विद्यार्थामध्ये गुणात्मकबदल होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग जिल्हा परिषद करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकांसाठी भरारी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनतर आता उमंग अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाषा,वाचन,लेखन आणि गणितीय संख्याज्ञानावर भर असणार आहे. विद्यार्थांना सहज सोप्या पद्धतीने भाषाज्ञान आत्मसाद व्हावे आणि पायाभूत संख्याज्ञानाचे आकलन व्हावे यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. करोनामुळे मागील दोन वर्ष शाळाबंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरु होते. १५ डिसेंबर पासून प्रत्येक्षात वर्ग सुरु झाल्याने विद्यार्थ्याच्या अध्ययन क्षमतेला गती मिळण्यासाठी हे अभियान फायदेशीर ठरणार आहे.
शिक्षक नियोजित तासिकामध्येच प्रवीण प्रशिक्षकांनी दिलेल्या क्लुप्त्यांचा वापर करून अध्यापन करणार आहेत. शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या अभियानाला मंजुरी देण्यात आली. यावेळी डायटचे प्राचार्य डॉ.भरत पवार,जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.संजय वाघ, अधिव्याख्याता डॉ. दिनेश चौधरी , विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर निपुर्ते सीखे संस्थेचे वर्षा परचुरे, सुमित कांबळे उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन 2020 नुसार, प्राथमिक स्तरावर सन 2026-27 पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. भारत सरकारने “समग्र शिक्षा” मध्ये निपुण भारत (National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy) अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता 3 री पर्यंत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान सन 2026-27 पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. या उपक्रमाला पूरक असे उमंग अभियान जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.