नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – ठाणे महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. त्यानुसार २०२२ -२३ चा सुधारीत ४ हजार २३५ कोटी तर २०२३-२४ चा ४ हजार ३७० कोटींचा मुळ अर्थसंकल्प ठाणे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सुर्यवंशी यांनी ठामपा आयुक्त अभिजीत बांगर यांना सादर केला. महसुली उत्पन्न वाढीकडे लक्ष ठेवुन कोणतीही करवाढ व दरवाढ नसणारा यंदाचा हा काटकसरीचा वास्तव अर्थसंकल्प आहे. स्वतंत्र धरण यासाठी कोणतीही तरतुद केलेली नसली तरी शहरातील स्वच्छता आणि आरोग्यावर भर देण्यात आली आहे.
राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या रूपाने एक ‘ठाणेदार’ विराजमान झाल्यानंतर ठाण्याच्या विकासालाही चालना मिळाली असुन याचे प्रतिबिंब ठाणे महापालिकेच्या आजच्या अर्थसंकल्पात उमटले आहे. या अनुषंगाने ठाणे महापालिका क्षेत्रात ” मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना ” राबवण्याचे पालिकेने ठरवले आहे. या अंतर्गत सुदृढ बालक – सुदृढ माता हा हेतु अभिप्रेत ठेवला असून यासाठी तब्बल २५ कोटींची तरतुद अर्थसंकल्पात आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर भिस्त ठेवली आहे.