प्रतिनिधी .
ठाणे – जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचे आकलन करून आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करताना, कोरोना विषाणू व पाउस यांमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीमध्ये नियोजन करतांना सर्व विभागांनी समन्वयाने व संघभावनेने काम करावे अशा सूचना राज्याचे नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.
ठाणे जिल्ह्यात मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री ना. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे मनपा आयुक्त विजय सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी निर्देश देण्यात आले की, जिल्ह्यातील सर्व विभागांनी 1 जून पासून आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करुन कार्यान्वित करावेत. जिल्हा मुख्य नियंत्रण कक्ष हा कार्यरत असून तेथे टोल फ्री क्रमांक 1077 व 022-25301740 तसेच 022-25381886 हे दूरध्वनी चोविस तास कार्यान्वित करण्यात यावे. कोणत्याही आपत्तीच्या घटनेची माहिती संबंधितांनी तात्काळ कळवावी.
पाटबंधारे विभागाने प्रत्येक धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे संनियंत्रण करावे. धरणातून विसर्ग करावयाचा असल्यास नदी काठावरील गावांना पूर्वसुचना द्यावी.
सर्व नगरपालिका, महानगरपालिकांनी आपापल्या कार्यक्षेत्रात पावसाळापूर्व नालेसफाईची कामे पूर्ण करुन शहरातील कोणत्याही सखल भागात पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या काठावरील झाडांच्या फांद्या पडून रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. वृक्ष उन्मळून पडल्यास ते तात्काळ हटविण्याची व्यवस्था करावी आरोग्य विभागाने साथीचे आजार फैलावणार नाहीत याची दक्षता घ्यावी. औषधांचा साठा परिपूर्ण ठेवावा. पशुसंवर्धन विभागाने जनावरांचे औषध साठा उपलब्ध ठेवणे, साथीचे आजार फैलावणार नाहीत याची दक्षता घेणे, एमटीएनल ने दूरसंचार सेवा सुस्थितीत ठेवणे, वादळ, पावसामुळे यंत्रणा बंद पडल्यास ती तात्काळ पूर्ववत करणे, गृहरक्षक दलाने पोलिसांच्या मदतीसाठी तत्पर असणे या प्रमाणे सर्व विभागांना सुचना देण्यात आल्या. तसेच सागरी किनारपट्टी भागात उधाणाच्या स्थितीबाबत माहिती देणे, गावकऱ्यांना व मच्छिमारांना कळविणे यासाठी स्थानिक प्रशासनाने यंत्रणा राबवावी.
कोरोना आणि पाऊस यां दोहोंचा सामना एकाचवेळी करावयाचा आहे. सर्व विभागांनी एकत्रितपणे दोन्हींचे नियोजन करावे. लॉकडाउन च्या काळात मान्सुनपुर्व कामांना प्राधान्य देऊन पूर्ण करावे. सर्व कामे सुरक्षित टप्प्यापर्यत पूर्ण होतील याची खबरदारी सर्व मनपा व विभागांनी घ्यावी. मागील वर्षात झालेला पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करुन यंदाचे नियोजन करावे अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांनी मान्सुनच्या काळात करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच मान्सुनपूर्व कामांच्या सद्यस्थितीची माहिती दिली.