नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
ठाणे/प्रतिनिधी – एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे तर दुसरीकडे गुन्हेगार नवनवीन प्रयोग करून सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात अवैधरित्या अग्निशस्त्राची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. यामध्ये एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नवी मुंबईतील रबाले पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल आहे. काही दिवसांपूर्वीच हा आरोपी जामीनावर बाहेर आल्याची बाब तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 6 पिस्तूल आणि 2 गावठी कट्टे 1 मॅगझीन आणि 22 काडतुसे जप्त केली आहेत. तसेच हे अग्निशस्त्र उत्तरप्रदेश आणि बिहार मेड असून अटकेतील दोघे पैसे मिळविण्याच्या उद्देशाने विक्रीसाठी आले असावे अशी माहिती उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे.
ठाणे गुन्हे शाखा पथकाचे सहायक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या पथकाने मूळ बिहारच्या शंभू सुरेश महतो (35) याला अवैध अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आला असताना अटक केली. त्याच्याकडून 3 लाख 40 हजार रुपयांचे 4 पिस्तूल, 2 गावठी कट्टे ,1 मॅगझीन आणि 18 जिवंत काडतुसे हस्तगत केले. ही कारवाई ठाणे शहर पोलिसांनी 18 एप्रिल रोजी केली असून आरोपींना 25 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. तसेच वागळे इस्टेट गुन्हे शाखा 5 चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेल्या चंदीगड येथील शेराबहादूर नवबहादूर काटकी याला आज वागळे इस्टेट 22 येथून अटक केली आहे. त्याच्याकडून 1 लाख 4 हजार रुपयांचे दोन गावठी पिस्तुल आणि 4 काडतुसे हस्तगत केले असून त्याच्यावर पंजाबमध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुक प्रक्रिया 2024 कायदा व सुव्यवस्थेस बाधा न येता शांततेत पार पडावी या करिता पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकांना जास्तीत जास्त अवैध शस्त्र, अंमली पदार्थ विरोधी कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्वच पोलिस पथके आप-आपली जबाबदारी चोखरित्या पार पाडत आहेत.