नेशन न्यूज मराठी टीम.
अकोला / प्रतिनिधी – महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर, पाणीपट्टी तसेच होर्डिंग, बाजार व परवाना विभागामार्फत होणाऱ्या वसुलीसाठी स्वाती इंडस्ट्रीजची नियुक्ती केल्याच्या विरोधात ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेला शहरातील जयहिंद चौक येथून प्रारंभ केला आहे.
मनपा प्रशासनाने शहरवासीयांकडून मालमत्ता कर वसूल करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त केली आहे.तर मागील आठ दिवसांपासून या एजन्सीने टॅक्स वसुलीला सुरुवात केली आहे, तर मालमत्ता कर विभागातील करवसुली लिपिकांनी चालू आर्थिक वर्ष व थकीत मालमत्ता करापैकी एकूण 207 कोटींपैकी 107 कोटी रुपये वसूल केल्यानंतरही प्रशासनाने तब्बल 8.48 टक्के दरानुसार करवसुलीसाठी खासगी एजन्सी नियुक्त केली आहे.
यासाठी कंत्राटदाराला पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे 60 कोटी रुपये देयक अदा केले जाणार असून ही अकोलेकरांची आर्थिक फसवणूक असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मिश्रा यांनी हा कंत्राट रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून या साक्षरी मोहिमेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.