नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओप्रकरणी उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून उद्धव ठाकरे गटाकडून राज्यात ठिकठिकाणी सोमय्या यांचा निषेध केला जात आहे. कल्याणमध्येही यांचे पडसाद पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटक विजया पोटे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन केले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ समोर आला असून त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ऐन पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांच्या हाती सत्ताधाऱ्यांविरोधात आयतेच कोलीत मिळाले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून राज्यात सोमय्या यांच्याविरोधात निदर्शने आणि निषेध आंदोलन केले जात आहे.
म्हणून कल्याणमध्येही शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. तसेच राज्य सरकारकडून किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही यावेळी ठाकरे गटाकडून करण्यात आली.
या आंदोलनात महिला जिल्हा संघटक विजया पोटे यांच्यासह वृंदा कांबळी, सुनीता ढोले, पल्लवी बांदिवडेकर, सुनिता लेकावळे, नमिता साहू, संगीता गांधी, सविता बळे, मथुरा परदेशी, मोरे, भारती भोसले, अस्मिता गोवळकर, इंद्रायणी बिके आदी महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.