नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे/प्रतिनिधी – केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयातर्फे देशातील भूमी, समूद्र, आणि हवेच्या साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या साहसी खेळाडूना देण्यात येणाऱ्या तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन २०२२ साठी दि.१४ जुलै २०२३ पर्यंत नामांकने मागविण्यात आलेली आहेत. सदर नामांकने सादर करण्यासाठी http://awards.gov.in या पोर्टलवर भेट देऊन, ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले आहे.
या पुरस्कारासाठी नामांकन सादर करणाऱ्या खेळाडूंची कामगिरी मागील तीन वर्षामधील असणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी आवश्यक असणारी कामगिरी म्हणजेच साहसी उपक्रम जमीन, हवा किंवा पाणी याठिकाणी केलेली असणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी आवश्यक असणारी कामगिरी म्हणजेच साहसी उपक्रम अत्युकृष्ट असणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व साहसी उपक्रम करणाऱ्या खेळाडू, नागरिकांनी केंद्र शासनाच्या वरील पोर्टलवर भेट देऊन तेनझिंग नोर्गे पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक असणारे क्रीडा विभागाचे शिफारस पत्र प्राप्त करून घेण्यासाठी अर्जदारांनी त्यांचा अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह क्रीडा विभागाच्या desk10.dsys-mh@gov.in या ई-मेल आय.डी.वर किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. १२ जुलै, २०२३ पर्यंत सादर करावा. प्राप्त अर्जांची छाननी करून, पात्र उमेदवारांना शिफारसपत्र प्रदान करण्याची कार्यवाही करण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालय, ठाणे (दूरध्वनी क्रमांक- ०२२२५३६८७५५) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले आहे.