नेशन न्यूज मराठी टीम.
अकोला / प्रतिनिधी – देशात जात व धर्माच्या नावावर अवास्तववादी राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे समाज व्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने शिक्षकांनी समाज व्यवस्थेला शिक्षित करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी अकाेला जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेतर्फे आयाेजित सेवानिवृत्त शिक्षकांचा सपत्निक सत्कार व विद्यार्थ्यांचा गुणगाैरव पुरस्कार साेहळ्यात व्यक्त केले.
अकोला जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेतर्फे रविवारी स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृहात पतसंस्थेची आमसभा आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन वंचितचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. विचारपीठावर वंचितच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती हाेती. कार्यक्रमाला पतसंस्थेचे अध्यक्ष शशीकांत गावयकवाड यांच्यासह जि.प. अध्यक्षा संगिता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, सभापती आम्रपाली खंडारे, रिजवाना परवीन, माया नाईक, याेगिता राेकडे, गट नेते ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हाध्यक्ष प्रमाेद देंडवे, प्रदीप वानखडे, गाेपाल काेल्हे, बालमुकुंद भिरड, गोपाल राऊत, ॲड. संताेष रहाटे, विकास सदांशिव यांच्यासह पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रमाेद उपाध्ये, संचालक देवानंद माेरे, ज्ञानेश्वर टाेहरे, संजय इंगळे, माराेती वराेकार, अरविंद आगासे, विद्या सातव, रजनीश ठाकरे, नीलेश काळे, सारीका देशमुख, प्रमाेद काळपांडे आदी हाेते. सूत्रसंचालन शिक्षक किशाेर बळी यांनी केले. शिकवले किंवा न शिकवले तरी शिक्षकांना महिन्याला वेतन मिळते. चांगले शिकवणाऱ्या शिक्षकाचे काैतुकही हाेते. वयाच्या ५८ वर्षानंतर सेवानिवृत्त हाेते; त्यानंतर शाश्वत आयुष्य संपते आणि अशाश्वत व्यवस्थेला प्रारंभ हाेताे. अशा परिस्थितीत पतसंस्थेकडून मानवतावादी दृष्टीकाेण ठेवून मिळणारी मदत महत्त्वाची आहे, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.
लाेकांच्या पाेटासाठीचे राजकारण बंद काॅंग्रेस सत्तेत आल्यानंतर मुस्लिम म्हणायचे कि इस्लाम खतरे में है. आता भाजप सत्तेत आल्यानंतर आता हिंदू खतरे में हैं, असे म्हटले जाते. कॉंग्रसने धर्म निरपेक्षच्या नावाने; तर भाजपने हिंदूच्या नावे सत्ता घेतली. धर्माच्या नावाने राजकारण सुरू झाले आणि लाेकांचे पाेटासाठी असलेले राजकारण बंद झाले, अशा शब्दात ॲड. आंबेडकर यांनी राजकारणावर भाष्य केले.
मतदारांमध्ये जागरूकता आवश्यक विविध साहित्याची मागणी व पुरवठा यात फरक आहे. तुटवडा निर्माण केल्यानंतर महागाई वाढते. तुटवडा कृत्रीम असताे. बाजार नियंत्रित करणे, त्यावर लक्ष ठेवणे हे सरकाराचे सर्वात माेठे काम आहे. आता हे नियंत्रण करायचे असेल तर मतदारांनी जागृत हाेणे महत्त्वाचे आहे. व्यापारी, कारखानदार निवडून आल्यास ताे आपलेच हित पाहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विचार करावा असेही ते म्हणाले.
नवीन व्यवस्थेशी जुळणे आवश्यक धर्म-जात आधारित जुनी व्यवस्था सध्या वैध नाही. तर नवी व्यवस्था आर्थिक-सामाजिक आधारावर असून या नवीन व्यवस्थेशी जुळणे आवश्यक आहे. तरच देशात शांतता नांदेल अन्यथा भारतात मणिपूर घडल्याशिवाय राहणार नाही असेही बाळासाहेब म्हणाले.