कल्याण प्रतिनिधी- हळदीचा कार्यक्रम सुरू असताना घरात असलेल्या तीन जणांवर जीवघेणा हल्ल्या झाल्याची धक्कादायक घटना कल्याण मधील सापर्डे गावात घडली आहे. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर दोन जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. लूटीच्या उद्देशाने हा प्रकार घडला आहे की या मागे दुसरा काही कारण आहे याचा तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत.
कल्याण पश्चिमेतील सापर्डे गावात रात्री साडेबाराच्या सुमारास एका तरुणाचा हळदी समारंभ सुरू होता. गावातील लोक या कार्यक्रमात व्यस्त होते. याच दरम्यान ज्या तरुणाचा हळदी कार्यक्रम सुरू होता त्याच्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नातेवाईकाच्या घरी अज्ञातांकडून तीन जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात सुवर्णा गोडे या महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला तर भारती म्हात्रे आणि पवन म्हात्रे हे दोघे गंभीर जखमी झाले.
याबाबत खडकपाडा पोलीस स्टेशनचे व.पो.नि. अशोक पवार यांना विचारले असता, या घटनेत एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी आहेत. मात्र ही घटना नक्की लुटीच्या उद्देशाने झाली आहे की नाही याचा तपास सुरू आहे. यामागे दुसरं काही कारण आहे का या दृष्टिकोनातून सुद्धा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.